दुर्गंधीत गिरविले जातात धडे

By Admin | Published: September 1, 2015 04:32 AM2015-09-01T04:32:08+5:302015-09-01T04:32:08+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तामिळ माध्यमाच्या शाळेच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने येथील विद्यार्थी दुर्गंधीच्या वातावरणात शालेय धडे गिरवित आहेत

False Lessons | दुर्गंधीत गिरविले जातात धडे

दुर्गंधीत गिरविले जातात धडे

googlenewsNext

प्रशांत माने, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तामिळ माध्यमाच्या शाळेच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने येथील विद्यार्थी दुर्गंधीच्या वातावरणात शालेय धडे गिरवित आहेत. त्याचप्रमाणे या शाळेची जागा केडीएमसीच्या नावावर नसल्याने सर्वशिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेला २७ लाखांचा निधी परत पाठविण्याची नामुष्की ओढवली आहे.
मोहने परिसरातील तिपन्नानगर या ठिकाणी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्राथमिक विद्यालय ही तामिळ माध्यमाची एकमेव शाळा आहे. सकाळी ७ ते दुपारी १२.३० आणि दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० या दोन सत्रांत भरणाऱ्या या शाळेची विद्यार्थी पटसंख्या २०७ आहे. इयत्ता १ ली ते ८ वीचे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. इयत्तांचा आढावा घेता पहिलीत २८, दुसरीत १८, तिसरीत २८, चौथीमध्ये २६, पाचवीत २१, सहावीत ३७, सातवीमध्ये ३१ तर आठवीत २६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बालवाडीत २६ विद्यार्थी आहेत.
मुख्याध्यापकांसह ७ शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. पटसंख्या आणि शिक्षकांची संख्या समाधानकारक असली तरी उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी तीनच खोल्या असल्याने वर्गांची गैरसोय होत आहे. शाळेची जागा वन विभागाची आहे. तिचा सातबारा केडीएमसीच्या नावावर नसल्याने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या बांधकामासाठी मंजूर झालेला २७ लाखांचा निधी शासनाकडे परत पाठविण्याची नामुष्की शिक्षण मंडळावर ओढवली आहे. शाळेच्या परिसरात तामिळ
भाषिकांचे प्राबल्य असून या परिसरात सुमारे साडेचारशे कुटुंबे
वास्तव्याला आहेत. त्यामुळे जागेअभावी शाळेचे इतरत्र स्थलांतर करणे परवडणारे नाही.
दरम्यान, हा परिसर घाणीच्या साम्राज्याने व्यापलेला असल्याने येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे स्वाइन आणि डेंग्यूसारख्या आजारांनी शहरात थैमान घातले आहे. त्यात येथील परिस्थितीकडे केले जात असलेले दुर्लक्ष पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: False Lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.