महावितरण कर्मचाऱ्यांसाठीचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:22 PM2020-01-09T17:22:10+5:302020-01-09T17:22:13+5:30
कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल व कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयातील ८०० जणांचा सहभाग
डोंबिवली: अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचाऱ्यांना रोजच्या ताण-तणावातून कांही क्षण विरंगुळा मिळावा या उद्देशातून कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यास यावर्षीपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार कोंकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल व कल्याण एक आणि दोन मंडल कार्यालयांतर्गत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याण पश्चिममधील प्र. के. अत्रे नाट्यगृहात नुकताच आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात झाला.
कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे व कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता. दिनेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित स्नेहमेळाव्याचा मनमुराद आनंद वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना. नाळे म्हणाले, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून व मानव संसाधन विभागाचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त). पवन कुमार गंजू यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा, नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जातात.
आता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही अशा उपक्रमात सहभागी करून ऊर्जा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक उर्जावान करण्यासाठी स्नेहमेळावा सुरु करण्यात आला आहे. मुख्य अभियंता श्री. अग्रवाल म्हणाले, सीमेवर तैनात सैनिकांप्रमाणेच वीज कर्मचारीही जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करतो. त्यामुळेच ग्राहक अखंडित विजेचा आनंद घेऊ शकतो. या कर्मचाऱ्यांच्या कामात उत्साह निर्माण करण्यात स्नेहमेळावा उपयोगी ठरेल.
प्रख्यात संमोहन तज्ज्ञ डॉ. प्रक्षित गायकवाड यांनी छोट्या-छोट्या गोष्टींमधून कामात कसा आनंद निर्माण करता येईल, यासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच कांही कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संमोहित करून संमोहनाचे महत्व मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवून दिले. डॉ. गायकवाड यांच्या खिळवून ठेवणाऱ्या कार्यक्रमाने उपस्थित कर्मचारी व कुटुंबीयांनी मंत्रमुग्ध केले.
पूर परिस्थितीत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सन्मान याप्रसंगी करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंते सर्वश्री शैलेंद्र राठोर, धर्मराज पेठकर, सुनील काकडे, प्रवीण परदेशी, विजय मोरे, ज्ञानेश कुलकर्णी, महाव्यवस्थापक श्री. अनिल बराटे, सहायक महाव्यवस्थापक. सुनील पाठक, उप-महाव्यवस्थापक योगेश खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड आणि उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, सर्व कार्यकारी अभियंते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जवळपास ८०० कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.