हॉस्पिटलमधून कुटुंबाला आला फोन, तुमचा रुग्ण दगावला, घरी रडारड सुरु झाली पण त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 01:30 PM2020-07-07T13:30:29+5:302020-07-07T13:31:03+5:30
कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी जोशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयु बेड रिकामा नसल्याने त्यांचे नातलग अन्य रुग्णालयात सदरची सुविधा मिळते का पहात होते.
मीरारोड - कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेच्या कुटुंबीयांना चक्क रुग्ण मरण पावल्याचा फोन भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातून केला गेला होता. त्यानंतर महिलेच्या नातलगांची रडारड झाली. पण नंतर मात्र चुकून फोन केला गेल्याचे सांगण्यात आले. घडलेल्या प्रकारामुळे नातेवाईकांंनी संताप व्यक्त केला आहे.
कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी जोशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयू बेड रिकामा नसल्याने त्यांचे नातलग अन्य रुग्णालयात सदरची सुविधा मिळते का पहात होते. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचारी कडून शहरातील एका खाजगी रुग्णालयाचे नाव सुचवून 1 लाख अनामत रक्कम व 50 हजार रोज असे शुल्क सांगण्यात आले. परंतु तेवढी ऐपत नसल्याने सदर रुग्णाच्या नातलगांना मुंबईच्या नायर रुग्णालयात खाट उपलब्ध झाली.
नायर रुग्णालयात नेण्यासाठी पालिकेने रुग्णवाहिका नसल्याचे सांगीतल्याने मुंबई भागातील एका खाजगी कार्डिएक रुग्ण वाहिकेस भाईंदरला येऊन नायरला नेण्याकरीता 12 हजारांचे भाडे ठरवले. 3 रोजी सकाळी रुग्णवाहिका मुंबई वरुन निघाली असताना दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांना जोशी रुग्णालयातून बोलत असल्याचा फोन आला आणि तुमचा रुग्ण मरण पावल्याचे सांगण्यात आले. ते एकुन नातलग रुग्णालया जवळ गोळा झाले. त्यांची रडारड सुरु होती.
मुंबईवरुन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकास येऊ नको असा निरोप दिला. पण नातलगांनी रुग्णालयात चौकशी केली तेव्हा मात्र रुग्ण जिवंत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराने नातलगांचा संताप अनवार झाला. मग पुन्हा रुग्णवाहिका चालकास येण्यास कळवले असता तो पर्यंत नायर रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा बेड निघून गेल्याने मग सेव्हन हिल्स रुग्णालयात रुग्ण महिलेस नेण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक यांनी घडल्या प्रकाराची माहिती देत एकूणच पालिका कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या आधी देखील जोशी रुग्णालयात एका मुलास त्याच्या कोरोनाग्रस्त वडिलांचा मृतदेह ऐवजी दुसराच मृतदेह दिला होता. डोक्यावरील केसा वरुन वेळीच मुलाला कळले म्हणून गंभीर चूक टळली होती.