Coronavirus News: वडिलांच्या अंत्यसंस्काराला कुटुंब मुकले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:48 AM2020-06-18T00:48:21+5:302020-06-18T00:49:37+5:30
जावयाने केले अंत्यविधी; संकटांचा डोंगरच उभा, संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाचा विळखा
- पंकज पाटील
अंबरनाथ : घरातील ज्येष्ठ व्यक्ती असलेल्या ८० वर्षीय वृद्ध वडिलांना त्यांच्या मुलांनी उपचार मिळावे यासाठी मोठा संघर्ष केला. उपचाराला चार दिवस उलटत नाही तोच घरातील सर्व सदस्य कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल आला. या पाठोपाठच त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची बातमीही आली. एकापाठोपाठ एक संकट ओढवल्याने हे कुटुंब चिंतेत पडले. त्यातच आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणालाच जाता न आल्याने त्याचे शल्य सर्वाधिक होते. अखेर जावयाने बुधवारी पहाटे अंत्यसंकार केले. अंबरनाथ कानसई सेक्शन परिसरात राहणारे एक ज्येष्ठ यांना ११ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झाले. त्याच ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी केली. मात्र त्रास वाढल्याने त्यांना डॉक्टरांनी दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लक्षणे असल्याने कोणत्याच रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही. अखेर अंबरनाथ पालिकाचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्या मध्यस्थीने त्या व्यक्तीला बदलापूरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
१३ जून रोजी रात्री त्यांना या रुग्णालयात दाखल केले त्यावेळेस त्यांची प्रकृती गंभीर होती. वडिलांवर उपचार सुरू असताना त्यांच्या लहान मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. त्या मुलाला कुटुंबीयांनी मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले. कुटुंबातील एक सदस्य कोरोनाग्रस्त झाल्याने आणि दुसरा रुग्ण मृत्यूशी झुंज देत असल्याने सगळे हतबल झाले होते. कोरोना चाचणीचा अहवाल न आल्याने त्या वृद्ध व्यक्तीवर बदलापूरच्या रुग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत गेली आणि त्यांची मृत्यूशी झुंज सुरू झाली. याच दरम्यान घरातील इतर सहा सदस्यही कोरोनाग्रस्त झाल्याचा अहवाल आल्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले. या सर्वांना अंबरनाथ पालिकेने रुग्णालयात दाखल केले. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोच वडिलांच्या निधनाची बातमी आली. चाचणी अहवाल येण्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनसमोर मोठे संकट उभे राहिले होते.
कोणताही नियम न मोडता व आग्रह न करता त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यांचा हा निर्णय जड अंतकरणाने घेतला होता. जवळचा एकही नातेवाईक अंत्यविधीसाठी जाऊ शकत नसल्याने त्या व्यक्तीच्या जावयाला अंत्यविधीसाठी बोलावले. रुग्णालयात मृतदेह जास्त वेळ ठेवता येत नसल्याने लागलीच रात्रीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन अवघ्या सात ते आठ सदस्यांच्या उपस्थित अंत्यविधी केले.
आम्ही आयुष्यात असा विचार केला नव्हता. वडिलांच्या शेवटच्या क्षणी आम्ही त्यांच्याजवळ राहू शकलो नाही, याचे दु:ख आयुष्यभर राहील. त्यांचे अंत्यदर्शनही आम्हाला घेता आले नाही.
- मृत व्यक्तीचा लहान मुलगा
वडिलांना दाखल करण्यासाठी मी बदलापूरच्या रुग्णालयात गेलो होतो. त्यांना दाखल केल्यानंतर मी स्वत:ची चाचणी केली. माझा अहवाल येण्याआधीच वडिलांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच माझाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अंत्यसंस्काराला जाता आले नाही. घरातील सर्व सदस्य कोरोनाग्रस्त असताना अंत्यसंस्कारासाठी किमान मला जाता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र तीही पूर्ण झाली नाही.
- मृत व्यक्तीचा मोठा मुलगा