गाईला वाचविण्यासाठी कुटुंबाने ओढली बैलगाडी! प्रेम पाहून, मुके मातृत्वही गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:26 AM2022-04-19T06:26:52+5:302022-04-19T06:28:17+5:30
गाेरक्षणाचा केवळ संदेश नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीही...
विशाल हळदे -
ठाणे : गोमातेचे रक्षण करा, असे नुसते संदेश देऊन चालत नाही तर त्यासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकणारी माणसं या जगात आहेत याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील विहिगावात आला. जखमी झालेल्या गर्भवती गाईला बैलगाडीत घालून भरउन्हात ती गाडी स्वत: ओढत नेऊन तिच्यावर उपचार करण्यासाठी अख्खे कुटुंब धावले. हे पाहून त्या मुक्या जिवाच्याही डोळ्यात अश्रू तरळले.
आयुष्यभर आधार देणारी ‘ढवळी’ अपघातात जायबंदी झाली. तिला वाचवण्यासाठी घरातील मुला-बाळांनी तिला बैलगाडीमध्ये टाकले. बैलांच्या जागी स्वत:ला जुंपले. भर उन्हात बैलगाडी ओढत तिला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. मूलभूत साधनांअभावी ग्रामीण भागात जगणे आजही कष्टप्रद आहे मात्र तिथे भूतदया आजही जिवंत आहे, हे यातून दिसले.
गाेमातेच्या डोळ्यात अश्रू -
कसारा घाटातून जव्हारकडे जाणाऱ्या मार्गावरील विहिगावात तुकाराम तेलम यांचे कुटुंब दाेन बहिणी ढवळी आणि पवळी या गायींचे दूध विकून उदरनिर्वाह चालवते. सोमवारी तुकाराम गायींना चरण्यासाठी शेतावर घेऊन गेले असता ढवळीचा पाय घसरून सहा ते सात फूट खोल खड्ड्यात पडली. ग्रामस्थांच्या मदतीने ढवळीला कसेबसे बाहेर काढले. यात ढवळीचे कमरेचे हाड मोडले. ती गर्भवती आहे. गावात पशुवैद्यक नसून कोणतीही वाहनाची सुविधा नसल्याने कुटुंबाने तिला बैलगाडीतून जवळपास दोन किलोमीटरचा पट्टा पार केला.