हळदीच्यावेळी पोलिसांना बोलावले; मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी कुटुंबाला चोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 12:49 AM2021-04-08T00:49:53+5:302021-04-08T00:50:13+5:30
कानवे येथील सहा जणांवर सोमवारी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आसनगाव : हळदी समारंभात बाहेरगावचे पाहुणे गावात आल्याने कोरोना वाढेल म्हणून एका नागरिकाने पोलिसांना फोन करून बोलावल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी व नातेवाइकांनी एका कुटुंबाला मारहाण केली. कानवे येथील सहा जणांवर सोमवारी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कानवे गावातील रहिवासी सुरेश भावार्थे यांच्या मुलीचा हळदीचा ३१ मार्चला कार्यक्रम होता. त्यामुळे पाहुणे आले होते. याबाबत सुदाम भेरे याने किन्हवली पोलीस ठाण्यात कळविले. सुदाम याने पोलिसांना बोलविल्याचा राग धरत ४ एप्रिलला रात्री सुदामचा मोठा भाऊ अजित हा अंगणात उभा असताना शेजारी राहणारे तुषार भावार्थे, सुरेश आले व त्यांनी अजित याला विचारले, तुझा लहान भाऊ सुदाम याने पोलिसांना कळविले होते ना. तेव्हा अजितने सांगितले की, कोरोनाच्या संसर्गात गावात मंडळी कशाला जमवली म्हणून त्याने फोन केला असेल त्याबाबत मला काही माहीत नाही. त्यावेळी तुषार, सुरेश यांनी अजितला धक्काबुक्की केली. त्याच वेळी गणेश भावार्थे, हरेश पडवळ, अशोक भावार्थे, बबन पडवळ हे सहा जण आले. यातील तुषार याने अजितच्या हातावर रॉड मारून दुखापत केली. सुनील हा अजितला सोडवायला गेला असता गणेश याने सुनीलच्या डोक्यात रॉडने दुखापत केली. इतर कुटुंबीयांनाही मारहाण झाली.