‘त्या’ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे
By admin | Published: July 7, 2017 06:09 AM2017-07-07T06:09:10+5:302017-07-07T06:09:10+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने २००० मध्ये केलेल्या पूर्वेतील राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोळसेवाडी : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २००० मध्ये केलेल्या पूर्वेतील राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २४ ते २५ घरे तोडण्यात आली. त्यात बाधित झालेल्या कुटुंबीयांचे पुनर्वसन केले जाईल, असे महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. मात्र, १७ वर्षांत पुनर्वसन न झाल्याने रहिवासी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
२०१३ मध्ये कोळसेवाडी प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक उदय रसाळ यांनी बीएसयूपी योजनेतून बांधलेल्या इमारतींमध्ये या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, असा प्रस्ताव मांडला होता. त्याला तत्कालीन महापौर वैजंयती घोलप यांनी मान्यता दिली होती. महापालिकेच्या पुनर्वसन समितीच्या ११ आॅगस्ट २०१४ ला झालेल्या बैठकीत १५ कुटुंबीयांचे कचोरे येथील बीएसयूपी इमारतीत पुनर्वसन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे रहिवाशांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे कागदपत्रे जमा केली. मात्र, अद्याप पुनर्वसन न झाल्याचे रहिवाशांतर्फे त्यांच्या वकील अॅड. स्वाती गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना २० मार्चला पत्राद्वारे कळवले आहे.
महापालिका प्रशासनाने आतापर्यंत विविध कारणे पुढे करून आमचे पुनर्वसन करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे आमची घरे तुटल्यापासून आम्ही भाड्याच्या घरात राहत आहोत, असे राजेश गायकवाड, सुलोचना कांबळे, माया वाघमारे, प्रतिभा पवार आदी बाधितांनी सांगितले.
स्थानिक नगरसेवक सचिन पोटे म्हणाले, २०१४ मध्ये पुनर्वसनाचा ठराव मंजूर झालेला असतानाही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे.
महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यावर प्रशासनाकडून धोरणात्मक निर्णय लवकरच अपेक्षित आहे. राजर्षी शाहू उद्यान ते रमाबाई आंबेडकर चौक रस्त्यातील बाधितांचे अजूनही पुनर्वसन का झाले नाही, हा एक मोठा प्रश्नच आहे.-राजेंद्र देवळेकर, महापौर, केडीएमसी