प्रसिद्ध बालनाट्य व्यवस्थापक नरेंद्र आंगणे यांना यावर्षीचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 03:41 PM2020-10-29T15:41:30+5:302020-10-29T15:42:34+5:30
महाराष्ट्रामध्ये अनेक पुरस्कार सोहळे संपन्न होतात परंतु कुठेही बालनाट्याला पुरस्कार दिला जात नाही
ठाणे : गंधार ही संस्था गेली अनेक वर्षे मराठी बालरंगभूमीवर कार्यरत आहे. लहान मुलांचे शिबीर घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून अभिनयाचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्याचे काम करीत आहे. या शिबिरातून प्रशिक्षण घेउन अनेक बालकलाकारांनी आपली अभिनयाची चुणूक अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दाखवली आहे.
महाराष्ट्रामध्ये अनेक पुरस्कार सोहळे संपन्न होतात परंतु कुठेही बालनाट्याला पुरस्कार दिला जात नाही किंवा बालनाट्य करणाऱ्या संस्थेचा, कलाकारांचा, तंत्रंज्ञाचा सन्मान होत नाही आणि म्हणूनच या मंडळींचा सन्मान व्हावा व त्यांच्या कार्याची दखल कोणीतरी घ्यावी यासाठीच गंधार ही संस्था गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करते. केवळ बालनाट्या साठी दिला जाणारा हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव सोहळा आहे. बालरंगभूमीवर दर्जेदार बालनाट्य सादर व्हावीत हाच उददेश या सोहळ्याचा असल्याचे मत संस्थेचे सचिव बाळकृष्ण ओडेकर यांनी व्यक्त केले.
यावर्षी कोरोनामुळे बालनाट्य स्पर्धा जरी घेता आली नसती तरी एका जेष्ठ रंगाकर्मीचा सन्मान यावर्षी करण्यात येणार आहे. गेली ४० वर्षे नरेंद्र आंगणे यांनी बालरंगभूमीची व्यवस्थापक म्हणून पडद्यामागे राहून अविरत सेवा केली त्यांना यावर्षीचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे असे मत आयोजक व गंधारचे प्रमुख प्रा. मंदार टिल्लू यांनी व्यक्त केले.
यावर्षी या सोहळ्यामध्ये किलबिल सेलीब्रेशन या डिजिटल दिवाळी अंकाचे प्रकाशन व काही प्रातिनिधिक कोविड योध्याचा सन्मान देखील होणार आहे
सरकारचे सर्व नियम पाळून काही मोजक्याच पाहुण्याच्या व कलाकारांच्या उपस्तिथीत हा सोहळा १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होईल.