Coronavirus: कल्याणमधील प्रसिद्ध ज्येष्ठ वकील जुबेर काझी यांचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 05:40 PM2020-06-16T17:40:03+5:302020-06-16T17:40:30+5:30
काझी यांनी उर्दू माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले. वकिलीचे शिक्षण यांनी मुंबईतून घेतले होते. सुरुवातीच्या काळात त्यांना ठाणो जिल्ह्यातील ख्यातनाम वकिल प्रभाकर हेगडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
कल्याण-प्रसिद्ध ज्येष्ठ व अभ्यासू वकील जुबेर काझी (68) यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सूना, नातवंडे व भाऊ असा परिसार आहे. ते पापा काझी या नावाने सगळ्य़ांना परिचित होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
काझी यांना सहा दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा रक्तगट ए पॉझीटीव्ह होता. त्यांच्यावर प्लाझा उपचार पद्धतीने उपचार सुरु करण्यासाठी डॉक्टर प्रयत्नशील होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश न आल्याने काझी यांचा मृत्यू झाला.
काझी यांनी उर्दू माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतले. वकिलीचे शिक्षण यांनी मुंबईतून घेतले होते. सुरुवातीच्या काळात त्यांना ठाणो जिल्ह्यातील ख्यातनाम वकिल प्रभाकर हेगडे यांचे मार्गदर्शन मिळाले. अभ्यासाच्या जोरावर काझी ख्यातनाम वकिल झाले. गरीबांच्या केसेस ते मोफत लढत होते. कल्याण, ठाणो व मुंबईत त्यांनी वकिलीची प्रॅक्टीस केली. कल्याण व भिवंडीच्या दंगलीतील मुस्लिम तरुणांची केस त्यांनी लढली होती. समाजातील सर्व स्तरातील लोकांचे खटले त्यांनी लढविले. जातीय व धार्मिक सलोखा टिकून राहण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता. अशा प्रकारच्या खटल्यातील वादी व प्रतिवाद्यांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील तंटा मिटविण्याचे काम काझी यांनी केले.