उल्हासनगर महापालिका शाळेतील फॅन चोरीला
By सदानंद नाईक | Published: June 20, 2023 05:09 PM2023-06-20T17:09:35+5:302023-06-20T17:09:51+5:30
उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-२५ मध्ये १२ जून रोजी मुख्याध्यापिका गार्गी संजय चतुर्वेदी यांनी सहकारी कर्मचाऱ्यासह मुलांना देण्यात येणारे पुस्तके ठेवली.
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील महापालिका शाळा क्रं-२५ मधील फॅनची चोरी झाल्याचे उघड झाले असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यापूर्वी कोट्यवधी किंमतीच्या महापालिका शाळा मैदानावर एका खाजगी संस्थेने सनद मिळविल्याचे प्रकारही गाजत आहे.
उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-२५ मध्ये १२ जून रोजी मुख्याध्यापिका गार्गी संजय चतुर्वेदी यांनी सहकारी कर्मचाऱ्यासह मुलांना देण्यात येणारे पुस्तके ठेवली. तसेच दुसऱ्या दिवशी शाळेची साफसफाई करते वेळी शाळेतील तब्बल १० फॅन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यावर, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुख्याध्यापकीच्या तक्रारीनंतरही मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तब्बल ८ दिवसानंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. महापालिका शाळा क्रं-२५ ची राज्य शासनाने आदर्श शाळा म्हणून गौरविले असून लवकरच शाळेची पुनर्बांधणी करणार असल्याचे लेंगरेकर म्हणाले. या चोरीच्या घटनेने शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून शाळांना सुरक्षा रक्षक पुरविण्याची मागणी होत आहे.
महापालिका शिक्षण विभागा अंतर्गत मराठी, हिंदी व गुजराती माध्यमाच्या एकून २२ शाळा असून त्यामध्ये ४ हजार ५०० पेक्षा जास्त मुले शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षमुळे व राजकीय हस्तक्षेपामुळे शाळेची दुरावस्था झाली आहे. खेमानी परिसरातील महापालिकेच्या मराठी व हिंदी माध्यमातील दोन शाळेतील हजारो विद्यार्थी इमारत अभावी गेल्या ५ वर्षांपासून एका खाजगी संस्थेच्या शाळेत धडे गिरवीत आहेत. मात्र अद्यापही इमारतीचे काम सुरू करण्यात आले नाही. तर एक शाळा नाममात्र १ रुपया भाडेतत्त्वावर एका शैक्षणिक संस्थेला देण्यात आली. तर इतर शाळांची दुरावस्था असून खिडक्या, दारे तुटलेल्या अवस्थेत आहे. तसेच शाळेतील ग्रंथालय व संगणक रूम गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडल्या आहेत. मात्र संगणक दुरुस्ती व ग्रंथालय पुस्तकावर महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करीत आहेत.
महापालिका मैदान चोरीला?
कॅम्प नं-५ मासे मार्केट शेजारील महापालिका शाळेच्या मैदानावर एका खाजगी संस्थेने सनद काढली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आक्रमक भूमिका घेतक्याने, सनद रद्द करण्याची मागणी राज्य शासनासह प्रांत कार्यालयाकडे केली. मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याने, वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.