१० रुपयांत ६०० रुपयांचे फराळ साहित्य, शिवसेनेचा उपक्रम; कुपन घेण्यासाठी अंबरनाथकरांची तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 09:19 PM2021-10-26T21:19:20+5:302021-10-26T21:20:14+5:30
शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने हे वाटप बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले जाणार आहे. यासाठी आज कुपन वाटण्यात आले. हे कुपन घेण्यासाठी अंबरनाथकरांनी तोबा गर्दी केली होती.
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने दिवाळीच्या फराळाचे साहित्य अवघ्या १० रुपयांत देण्यात येणार आहे. बुधवारी होणाऱ्या या साहित्य वाटपाचे कुपन घेण्यासाठी आज अंबरनाथकरांनी प्रचंड गर्दी केली होती. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात अनेकांची आर्थिक परिस्थिती कठीण बनली आहे. त्यामुळं शिवसेनेकडून यावर्षी अवघ्या १० रुपयात ६०० रुपये किमतीचे फराळ साहित्य वाटपाची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने हे वाटप बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले जाणार आहे. यासाठी आज कुपन वाटण्यात आले. हे कुपन घेण्यासाठी अंबरनाथकरांनी तोबा गर्दी केली होती. शिवसेनेकडून २ ते अडीच हजार नागरिकांनाच कुपन देण्यात येणार असले, तरी रांगेतली गर्दी मात्र ५ हजारांच्या घरात होती. त्यामुळे शहर शाखेपासून सुरू झालेली रांग छत्रपती अहिवाजी महाराज चौक, नवरे आरकेड, सावंत आरकेड यामार्गे थेट वेल्फेअर सेंटरच्याही पुढे गेली होती. मात्र गर्दीत कुठेही बेशिस्तपणा, धक्काबुक्की पाहायला मिळाली नाही.
दहा रुपयात फराळ साहित्यचे कुपन घेण्यासाठी अंबरनाथकरांची तोबा गर्दी#ShivSenapic.twitter.com/uoUMgX0xOa
— Lokmat (@MiLOKMAT) October 26, 2021
शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांना रेशनकार्ड तपासून कुपन देण्यात आले. उद्या या सर्वांना फराळ साहित्याचे किट्स देण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली आहे. शिवसेना शहरशाखा आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून हेच साहित्य अर्ध्या किमतीत देण्यात येत होते. मात्र यंदा अनेकांची आर्थिक स्थिती कठीण असल्याने १० रुपयात जेवण, १० रुपयात रुग्णांवर उपचार याच धर्तीवर १० रुपयात हे फराळ साहित्य वाटप करण्यात येत आहे.