कारवाई टाळण्यासाठी फुकटचे भाडेकरू, साक्षीदाराने नोंदवला न्यायालयात जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:01 AM2018-02-16T02:01:27+5:302018-02-16T02:01:40+5:30
अवैध आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे महापालिकेने इमारत पाडण्याची कारवाई करू नये, यासाठी आरोपी विकासकांनी इमारतीमध्ये फुकटचे भाडेकरू ठेवले होते, असा जबाब लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेमध्ये एका साक्षीदाराने गुरुवारी न्यायालयासमोर नोंदवला.
ठाणे : अवैध आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे महापालिकेने इमारत पाडण्याची कारवाई करू नये, यासाठी आरोपी विकासकांनी इमारतीमध्ये फुकटचे भाडेकरू ठेवले होते, असा जबाब लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेमध्ये एका साक्षीदाराने गुरुवारी न्यायालयासमोर नोंदवला.
शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. ७४ जणांचा बळी घेणाºया या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस, पत्रकारांसह २७ आरोपींना अटक केली होती. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. लकी कम्पाउंडमधील एका चाळीमध्ये राहणाºया राजकुमार फतेहबहादूर सिंग यांचा जबाब गुरुवारी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयात नोंदवला. साक्षीदाराचे नातलग अजय सिंग एका अन्य चाळीत राहत होते. शौचालयाची सुविधा नसल्याने ते पर्यायी निवाºयाच्या शोधात होते. आरोपी विकासकांनी अजय सिंग यांना निर्माणाधीन इमारतीमधील खोली मोफत दिली. अजय सिंग हे पत्नी, चार मुलींसोबत येथे राहत असताना ४ एप्रिल २०१३ रोजी इमारत कोसळली. यात सिंग, त्यांची पत्नी, दोन चिमुकल्यांचा मुलींचा मृत्यू झाला. राजकुमार फतेहबहादूर सिंग यांनी ही माहिती न्यायालया दिली. तसेच दोन आरोपींची न्यायालयासमोर ओळख पटवली. दरम्यान या प्रकरणी शुक्रवारी राजकुमार यांची उलटतपासणी बचाव पक्षाच्या वतीने घेतली जाणार आहे.