रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान, अवमान याचिका कागदावरच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:56 AM2018-01-17T00:56:07+5:302018-01-17T00:56:22+5:30
न्यायालयाच्या मनाई आदेशानंतरही पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. स्थानक परिसरात १५० मीटरवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी लावून धरणा-या फेरीवाल्यांनीच राथ रोड पुन्हा बळकावला आहे
डोंबिवली : न्यायालयाच्या मनाई आदेशानंतरही पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. स्थानक परिसरात १५० मीटरवर पांढरे पट्टे मारण्याची मागणी लावून धरणा-या फेरीवाल्यांनीच राथ रोड पुन्हा बळकावला आहे. दरम्यान, फेरीवाले न हटल्यास केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेने दिला होता. परंतु, याप्रश्नी त्यांची अवमान याचिकाही कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतिक्रमण विभागाला न जुमानता फेरीवाले पूर्वेतील पाटकर रोड, नेहरू रोड, राथ रोड, स्वामी विवेकानंद रोड, उर्सेकर वाडीत पथारी पसरतात. फेरीवालाविरोधी पथक दाखल झाल्यानंतर त्यांची पांगापांग होते. त्यानंतर ते पुन्हा आपल्या जागी ठाण मांडतात. फेरीवल्यांमुळे राथ रोड, नेहरू रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर केडीएमसीच्या अधिकाºयांचे वचक नसल्याचे पाहायला मिळते.
मुंबईतील एलफिन्स्टन्स येथील पादचारी पुलावरील घडलेल्या दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, मनसे आता बॅकफूटवर आली आहे का?, केडीएमसी अथवा फेरीवाल्यांविरोधात त्यांनी अवमान याचिका का दाखल केलेली नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
या संदर्भात मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही नागरिकांनी फेरीवाल्यांचे फोटो पाठवल्याचे स्पष्ट केले. केडीएमसीला बोलून आम्हीही कंटाळलो. पोलीस संरक्षण मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मनसैनिक रस्त्यावर उतरल्यास एक लाखाचे बॉण्ड घेतले जातात, पण पोलिसांनी न्यायालयाचा अवमान करणाºया किती फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल केले, असा सवालही त्यांनी केला.