किल्ले सिंहगडावर रंगला निरोप समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:39 AM2020-02-19T00:39:15+5:302020-02-19T01:02:39+5:30
संकल्प इंग्लिश स्कूलचा उपक्रम : जयभवानी, जयशिवाजीचा जयघोष
ठाणे : शाळेचा निरोप समारंभ म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनात एकीकडे दु:ख तर एकीकडे नव्या जगात प्रवेश करण्याची ओढ, आतुरता असते. निरोप समारंभ हा पुढील आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरावा या उद्देशाने ठाण्यातील संकल्प शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा किल्ले सिंहगडावर झाला. ऐतिहासिक खेळांचे प्रदर्शन, गडाची सफर आणि जयभवानी, जय शिवाजीचा जयघोष अशा उत्साहाने भारलेल्या वातावरणात संकल्प इंग्लिश स्कूलच्या १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला.
अखंड महाराष्टÑाचे दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. राजांचे शौर्य आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष अनेक गडकिल्ले देतात. स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या स्मृतीदिनानिमित्त संकल्प स्कूलच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना सिंहगडावर नेण्यात आले होते. यावेळी तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासमोर विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, लाठीकाठी, तलावारबाजी अशा ऐतिहासिक खेळांचे प्रदर्शन केले. कोंढाण्याच्या लढाईचा थरार विद्यार्थ्यांनी पोवाड्यातून सादर करून तानाजी मालुसरे यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांना गडावरील कल्याण दरवाजा, टिळक बंगला, देवटाके, कोंढाणेश्वर मंदिर, डोणागिरीचा कडा, दारूकोठार अशा अनेक स्थळांचे दर्शन घडवले गेले. यावेळी जयभवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांसह संस्थापक डॉ.राज परब, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
उज्ज्वल भविष्याची सुरुवात
च्हा निरोप समारंभ नसून विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याची सुरूवात ठरेल. महाराजांची मूल्यनिष्ठा, कणखर बाणा विद्यार्थ्यांनी अंगी बाणवावा, या उद्देशानेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी नेण्यात आले होते, असे संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांनी सांगितले.