३२ हजार गणपतींसह गौराईंना निरोप; घरीच विसर्जनावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:52 AM2020-08-28T00:52:44+5:302020-08-28T00:52:56+5:30
दुपारपासून विसर्जन केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. अनेक घरगुती गणपती दुपारी लवकरच विसर्जित करण्यात येत होते. विसर्जनासाठीही घरातील मोजकीच मंडळी बाहेर पडलेली होती.
ठाणे : गुरुवारी ठाण्यातील विसर्जनघाट, कृत्रिम तलावांवर अतिशय शांतपणे, ढोलताशांविना, गर्दी टाळत एकूणच नियमांचे पालन करून गणरायांचे गौराईसह विसर्जन करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयात ३२ हजार ४२६ गणपतींचे तर, १३ हजार ७२९ गौरार्इंचे विसर्जन झाले. विशेष म्हणजे अनेकांनी घरी किंवा सोसायटीच्या आवारात कृत्रिम तलाव उभारून विसर्जन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने केलेल्या नियमांचे ठाणेकर भक्तगणांनी पालन करत सामाजिक भान राखलेले दिसले.
कोरोनाचे सावट असले तरी कोणतीही कमतरता न ठेवता बाप्पाची गेले सहा दिवस मनोभावे पूजा केल्यावर गुरुवारी गणपतीं-गौरार्इंचे विसर्जन करण्यात आले. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरांत ४० सार्वजनिक, ११ हजार ६७८ घरगुती गणेशमूर्ती आणि तीन हजार ७३० गौरी, भिवंडीत २७ सार्वजनिक, सहा हजार ३९० घरगुती आणि ६७० गौरी, कल्याण-डोंबिवलीत १४ सार्वजनिक, घरगुती सात हजार १५ आणि दोन हजार ४४२ गौरी तर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये दोन सार्वजनिक, सात हजार २६० घरगुती आणि सहा हजार ८८७ गौरींचे विसर्जन झाले.
दुपारपासून विसर्जन केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. अनेक घरगुती गणपती दुपारी लवकरच विसर्जित करण्यात येत होते. विसर्जनासाठीही घरातील मोजकीच मंडळी बाहेर पडलेली होती. एरव्ही ढोलताशे, डीजेने दणाणणारे, गुलालाने माखणारे रस्ते यंदा शांत होते. केवळ ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष ऐकायला मिळत होता. विसर्जनस्थळी आरती, सेल्फीला बंदी असल्याने विसर्जन केंद्रांवर गर्दीही होत नव्हती. अनेक सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांनाही शांततेत निरोप देण्यात आला. नियमानुसार बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती या चार फुटांच्या होत्या. तसेच ठाणे महापालिकेने केलेली फिरती विसर्जन व्यवस्था, मूर्ती स्वीकार केंद्रांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन केल्याने रस्त्यांवरही दरवर्षीपेक्षा कमी गर्दी होती.