आधारवाडी ते जेल रस्त्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:51 AM2018-05-16T03:51:39+5:302018-05-16T03:51:39+5:30
केडीएमसीने आधारवाडी ते कारागृहादरम्यानच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यात बाधित होणाऱ्या उमा भावे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती.
कल्याण : केडीएमसीने आधारवाडी ते कारागृहादरम्यानच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले होते. मात्र, त्यात बाधित होणाऱ्या उमा भावे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती. परंतु, ती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे २१ वर्षानंतर रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती केडीएमसीच्या विधी विभागाने दिली.
आधारवाडी ते कारागृह या रस्त्याच्या विकासाला महापालिकेने मंजुरी दिली होती. हा रस्ता १८ मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, या रस्त्याच्या लगत राहणाºया भावे यांनी १९९७ मध्ये कल्याण न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याविरोधात महापालिका प्रशासन अपिलात गेले होते. न्यायालयात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्याविरोधात भावे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. तेथे न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविरोधात भावे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दीड वर्षापूर्वी रस्त्याच्या विकासकामाला स्थगिती दिली होती. दीड वर्षानंतर ही स्थगिती उठवली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या विधी विभागास
ई-मेलद्वारे कळवले आहे. त्यामुळे रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. २१ वर्षांपासून भावे यांनी महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा दिला. मात्र, महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याने या रस्त्याचा विकास होणार आहे.
दरम्यान, हा लढा देत असताना भावे यांचे दरम्यानच्या काळात निधन झाले. आता ही याचिका त्यांचा मुलगा अनंत भावे चालवत होता, अशी माहिती विधी विभागाने दिली.
>भावे यांच्या घरावर बुलडोझर
सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवताच महापालिकेचे कारवाई पथक मंगळवारी तेथे पोहचले. भावे यांचे घर बुलडोझरद्वारे पाडण्यास सुरुवात केली. भावे कुटुंबियांनी सांगितले की, न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला नाही. पण महापालिकेने किमान एक दिवसाची मुभा द्यायला हवी होती. महापालिकेने शौचालयही तोडले. त्यामुळे घरातील चार महिला कुठे जातील. पर्यायी घर कुठे मिळणार? महापालिकेने जराही माणुसकी दाखवली नाही.