खोडाळ्यात शेतमजुराचे घर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:58 PM2021-01-15T23:58:19+5:302021-01-15T23:58:35+5:30
पंचनामा पूर्ण : घरातील साहित्य, अन्नधान्याचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील रहिवासी सुरेश बाळू पाटील यांचे घर बुधवारी रात्री अचानक कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घर खूप वर्षांचे आणि कुडा मातीचे असल्याने जीर्ण होऊन कोसळले. घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जीवितहानी मात्र टळली. परंतु, संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य मोतीमोल झाले असून, सुरेश पाटील यांना शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष संजय इधे यांनी केली आहे.
खोडाळा पश्चिमेस पाटीलवाड्यात सुरेश पाटील यांचे जुने कौलारू व कुडाचे घर आहे. बुधवारी रात्री ते आणि त्यांची पत्नी जेवण आटोपून बाहेर बसले असताना अचानक काही क्षणात संपूर्ण घर कोसळून सपाट झाले. त्यामध्ये भांडी, धान्य व इतर संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पाटील यांच्यावर ऐन थंडीच्या दिवसांत थंडी गारठ्यात राहण्याची वेळ आली. भिंत कोसळण्यापूर्वीच घरात कुणी नसल्यामुळे दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तलाठी व सरपंच प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा केला.