शेतकरी स्वत:हून ‘समृद्धी’साठी तयार, राज यांचा दावा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:45 AM2017-11-20T02:45:00+5:302017-11-20T02:46:16+5:30
डोंबिवली : समृद्धी महामार्गाबाबत सरकार सकारात्मक असल्याने शेतकरी स्वत:ची जमीन देण्यासाठी स्वत:हून पुढे येत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
डोंबिवली : समृद्धी महामार्गाबाबत सरकार सकारात्मक असल्याने शेतकरी स्वत:ची जमीन देण्यासाठी स्वत:हून पुढे येत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी समृध्दी महामार्गाच्या कामात सरकार स्थानिकांना विश्वासात घेत नसून या महामार्गाच्या आडून वेगळया विदर्भाची चूल मांडली जात असल्याचा आरोप केला होता. डोंबिवलीत एका खाजगी रूग्णालयाच्या कार्यक्रमाला रविवारी पालकमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांना या आरोपांबाबत विचारता त्यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊनच महामार्गाचे काम केले जात असल्याचे सांगितले. त्यांचे समाधान झाल्याशिवाय महामार्गाचे काम सुरू होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनतेच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत, त्यांना योग्य मोबदला मिळाला हवा, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये अशी भूमिका दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आहे. त्या भूमिकेची पुरेपूर अंमलबजावणी केली जाईल. कोणावर अन्याय होणार नाही, असेच मुख्यमंत्र्याचेही धोरण असून स्थानिकांचे समाधान झाल्याशिवाय पुढे कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
>केडीएमसीला खडे बोल
खाजगी रूग्णालयांप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आरोग्य सेवा सुधारणे आवश्यक असल्याचे खडे बोल पालकमंत्री शिंदे यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत अप्रत्यक्षपणे केडीएमसीला सुनावले. जर काम होत नसेल तर राज्य सरकार निश्चितच त्यांचा विचार करेल, असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. ठाण्यात युध्दपातळीवर आरोग्य सेवा सुधारण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असल्याचे त्यांनी खाजगी रूग्णालयाच्या कार्यक्रमात सांगितले. ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल ज्या धडाडीने काम करतात, तशाच कामाची अपेक्षा केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडून आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र येऊन काम केले पाहिजे. शहराचा विकास हाच केंद्रबिंदू मानून काम झाले पाहिजे, असे त्यांनी सुचवले.