किसान लाँग मार्च : पोळलेले पाय, वळलेल्या मुठींत संघर्षाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:32 AM2018-03-11T06:32:47+5:302018-03-11T06:32:47+5:30

आग ओकणारा सूर्य... तापलेल्या तव्यासारखा काळाकुट्ट डांबरी रस्ता तुडवत जाणारी हजारो पावलं... डोक्यावरील टोप्या आणि हवेत फडकणारे लाल बावटे... हे दृश्य शनिवारी ठाण्याच्या वेशीवर पाहायला मिळाले. कर्जमाफीपासून वनजमिनींचे पट्टे नावावर करण्यापर्यंत असंख्य मागण्यांकरिता विधिमंडळावर निघालेला किसान लाँग मार्च रात्री ठाणे मुक्कामी होता.

 Farmer Long March: Stucked feet, the determination of conflict in the folded knees | किसान लाँग मार्च : पोळलेले पाय, वळलेल्या मुठींत संघर्षाचा निर्धार

किसान लाँग मार्च : पोळलेले पाय, वळलेल्या मुठींत संघर्षाचा निर्धार

Next

- सुरेश लोखंडे/पंढरीनाथ कुंभार  

ठाणे/भिवंडी - आग ओकणारा सूर्य... तापलेल्या तव्यासारखा काळाकुट्ट डांबरी रस्ता तुडवत जाणारी हजारो पावलं... डोक्यावरील टोप्या आणि हवेत फडकणारे लाल बावटे... हे दृश्य शनिवारी ठाण्याच्या वेशीवर पाहायला मिळाले. कर्जमाफीपासून वनजमिनींचे पट्टे नावावर करण्यापर्यंत असंख्य मागण्यांकरिता विधिमंडळावर निघालेला किसान लाँग मार्च रात्री ठाणे मुक्कामी होता.
चंबुगबाळ घेऊन निघालेला शेतकरी दुपारी भिवंडीपाशी विसावला, तेव्हा संबळ-तारपा वाजू लागले. लागलीच काहींनी फेर धरून ते नाचू लागले. गर्दीतून वासुदेव पुढे सरसावला, त्यानेही स्वत:भोवती गिरकी घेतली. शेतकरी क्रांतीची, संघर्षाची गीते गात होते आणि बाकीचे सहकारी त्यांना टाळ्यांची साथ करत होते. एका कोपºयात लाकडाच्या चुलीवर अन्न रटरटा शिजत होते. शिजलेला भात एका ताडपत्रीवर पसरला गेला. कुणी झाडाखाली क्षणभर विसावला होता, तर कुणी चालूनचालून पायाला आलेल्या फोडांना मलमपट्टी करत होता. मात्र, साºयांच्या चेहºयांवर लढाईचा आत्मविश्वास होता. डोळ्यांत अन्यायाविरुद्ध संघर्षाची ठिणगी होती आणि शब्दाशब्दांत जिद्द ओतप्रोत भरली होती.
नाशिक-मुंबई महामार्गावरून विधानभवनाला घेराव घालण्यासाठी नाशिकहून सुमारे पाच दिवसांपूर्वी पायी निघालेला लाँग मार्च शनिवारी सकाळी वासिंद येथून निघाला. दुपारच्या वेळी ३५ ते ४० अंश सेंटिंग्रेड तापमानामुळे काहींना चक्कर आली. अनेकांच्या पायांना चालूनचालून फोड आल्यामुळे चालणे असह्य झाले आहे. मात्र, संघर्षाची जिद्द हेच त्यांच्या पायातील बळ आहे. पाच महिलांसह काही कार्यकर्त्यांवर भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या पथकाने उपचार केले. त्यानंतर, त्यांनी पुढे वाटचाल सुरू केली. पडघा येथून निघालेल्या या मोर्चातील मंदाबाई बाबुराव भोसले (६५) व गणपत तुकाराम चावळे (६०) हे चक्कर येऊन खाली कोसळले. आठ महिला, पुरुष, वयोवृद्ध कार्यकर्त्यांवर उपचार करण्यात आले. सुरेश गंगाराम पवार (२०) व देवराम बेंडकुळे यांच्या पायांत चपला नव्हत्या. त्यांच्या पायांना भलेमोठे फोड आले होते. प्रत्येक पाऊल टाकताना असह्य वेदना होत होत्या. त्यांच्यावरही उपचार झाले. शेकडो महिलांनी १०८ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्ससमोर रांग लावून स्वत:च्या किंवा आपल्या कच्च्याबच्च्यांच्या अंगातील कणकण घालवण्यासाठी गोळ्या घेतल्या.
उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असतानाही तारपा, संबळ आणि सनईच्या सुरांवर ठेका धरून नाचणाºया शेतकºयांचा व विशेषकरून महिलांचा उत्साह दांडगा होता. रस्त्यातून येताना मोर्चेकºयांमधील शिस्त वाखाणण्याजोगी असल्याचे पोलिसांनी आवर्जून नमूद केले. दुपारच्या जेवणासाठी सोनाळेगावाजवळ मैदानावर भटारखाना सज्ज झाला होता. ८० पथकांच्या या भटाºयांनी त्यांच्यात्यांच्या गटांतील मोर्चेकºयांसाठी भात, भाजी तयार ठेवली होती. पथकांच्या जेवणाचे सामानसुमान वाहून नेणाºया गाडीला कापड बांधून तयार केलेल्या सावलीत बसून मोर्चेकºयांनी जेवण घेतले. त्यामुळे मैदानाच्या चोहोबाजूंना पथकांच्या गाड्या आणि त्याभोवती जेवणावळी सुरू असल्याचे दृश्य दिसत होते. मैदानाच्या मध्यभागी पाण्याचा टँकर उभा होता. खोक्यातील रिकाम्या बाटल्यांत टँकरमधील पाणी भरून घेण्याकरिता गर्दी उसळली होती.
सुरुवातीचे दोन दिवस घरून आणलेल्या शिळ्या भाकºया, ठेचा आणि कांदा खाल्ल्याचे मोर्चेकरी सांगतात. नंतर, स्वयंपाकी पथकांनी आपापल्या गटांतील मोर्चेकºयांकडून पैसे गोळा करून धान्य खरेदी केले. एका मोठ्या ट्रकमध्ये ते ठेवले आहे. रोज दोन वेळा मिळून १०० किलो तांदूळ लागतात, असे नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील वांगणबरडा येथील प्रवीण काशिनाथ गवळी (३०) या स्वयंपाकी पथकाच्या कार्यकर्त्याने सांगितले.
भिवंडीजवळील बॉम्बे ढाब्यापाशी किसान मार्चचा शनिवारी रात्रीचा मुक्काम असणार होता. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री तर मनसेचे अविनाश जाधव यांनी मोर्चाच्या नेत्यांची भेट घेतल्याने ऐनवेळी जागा बदलून आनंदनगरच्या दिशेने मोर्चाने कूच केले. सनईचे सूर निनादत ठाण्यात मोर्चाने रात्री प्रवेश केला. अंधारातही लाल बावटा तेजाने फडकत होता. थकलेली, पोळलेली, फोड आलेली पावले क्षणभर विसावली... रविवारी सकाळी पुन्हा विधानभवनाच्या दिशेने दमदारपणे टाकण्याकरिता.


सुमारे ३० ते ४० वर्षांपासून वनजमीन कसत आहे. केंद्र शासनाच्या कायद्यानुसार या जमिनी आजपर्यंतही आमच्या नावावर
झाल्या नाही. वनखात्याकडून त्याची नोंद होत नाही, यामुळे जिल्हाधिकाºयांसह तलाठ्यांकडून सातबारावर नाव चढवण्याची कारवाई होत नाही. २० एकर वनजमिनीवर शेती होत असताना केवळ दोन एकरांचा सातबारा दिला आहे.
- एकनाथ गायकवाड

इयत्ता अकरावीत शिकत आहे. वडिलांचा मृत्यू झाला. १० एकर वनजमीन आहे, पण ती नावावर नाही. दमणगंगा नदीवर धरण न बांधता छोटेछोटे बंधारे बांधून ते पाणी महाराष्टÑासाठी वापरण्यात यावे. पण, या नदीवर गुजरातसाठी धरण बांधले जात आहे. त्यात महाराष्टÑातील २०० गावे बुडणार आहेत. ती गावे वाचवण्यासाठी आणि वनजमीन नावावर व्हावी, याकरिता मोर्चात आलो आहे.
- कालिदास कास

वनजमीन शेतकºयांच्या नावावर करून द्यावी. निराधार शेतकºयांच्या पेन्शनसाठी लागू केलेल्या अटी शिथिल कराव्यात. शाळेत गेले नसल्यामुळे अनेक वयोवृद्धांकडे शाळेचा दाखल नाही. याची जाणीव ठेवून शासनाने ही अट शिथिल करावी.
- सुरेश धूम कृष्णा भोये, अनंता बैरागी

शासनाची भूमिका वेळकाढूपणाची असून मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांशी चर्चा करूनही अंमलबजावणी शून्य आहे. शेतकºयांना ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत.
- कॉ. किसन गुजर
सरकारी जमीन कसत असलेल्या भूमिहीन शेतकºयांच्या नावांवर प्लॉट नावे चढवणे व शासनाने कर्जमाफी करणे, यासाठी आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहोत.
- तुळशीराम वाघ

आमच्या मोर्चाने या सरकारला जाग येईल आणि ते कर्जमाफीपासून सर्व मागण्या मान्य करील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा, आमचा संघर्ष सुरूच राहील.
- मथुराबाई शिंदे
आता आमचे वय झाले आहे. निदान, आमच्या पुढच्या पिढीच्या नावावर वनजमिनी होऊन त्यांना लाभ मिळावा आणि त्यांचे जगणे सुसह्य व्हावे, याकरिता आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहोत.
- लताबाई बेंडकुळे, लक्ष्मण राऊत, रामदास भोई, रामजी गारे, दत्तू बोरस्ते
 

Web Title:  Farmer Long March: Stucked feet, the determination of conflict in the folded knees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी