मफतलाल कंपनीच्या जागेसह खारभूमी जमिनीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 04:17 PM2022-02-15T16:17:30+5:302022-02-15T16:18:26+5:30
शेतकऱ्यांना संपादीत जमिनीपैकी नवीमुंबईच्या धर्तीवर १२.५ टक्के ऐवजी १५ टक्के जमीन मिळावी, याशिवाय न्यायालयीन आदेशानुसार कळवे येथील खारभूमी जमीन कसणार्या शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचे धरणे जनआंदोलन मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आले.
ठाणे- मफतलाल कंपनीकरीता संपादन व खरेदी केलेल्या शेत जमीनी ठाणे येथील कळवा, खारीगाव येथील शेतकऱ्यांच्या आहेत. आता या शेतकऱ्यांना संपादीत जमिनीपैकी नवीमुंबईच्या धर्तीवर १२.५ टक्के ऐवजी १५ टक्के जमीन मिळावी, याशिवाय न्यायालयीन आदेशानुसार कळवे येथील खारभूमी जमीन कसणार्या शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचे धरणे जनआंदोलन मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आले.
शासकीय विश्रामगृहासमोर हे जन आंदोलना संघर्ष कृती सेवा संस्थेचे संस्थापक दशरथ पाटील, यांच्या नेतृत्वाखाली छेडले गेले. या आंदोलनाला नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दि. बा. पाटील नामांतर सर्वपक्षीय कृती समिती व अखिल आगरी समाज परिषद या संघटनांनी पाठिंबा दिला होता, असे दशरथ पाटील म्हणाले. या आंदोलकांचे शिष्टमंडळ ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना भेटले. यावेळी माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, नगरसेवक उमेश पाटील, जे. डी. तांडेल, गुलाब वझे, दशरथ भगत, दिपक पाटील, वि. ह. म्हात्रे, राकेश पाटील, अरुण पाटील, नंदेश ठाकूर, अनिल भगत आदी विविध संघटनांचे प्रतानिधी उपस्थित होते.