वाड्यातील शेतकऱ्यांनी मांडली आमदारांकडे कैफियत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 01:26 AM2021-02-07T01:26:33+5:302021-02-07T01:26:40+5:30
बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल न घेतल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.
वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्चदाबाची वीजवाहिनी जात असून, या वाहिनीसाठी मनोरे उभारणीचे काम महापारेषणने हाती घेतले आहे. या वाहिनीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, ते देशोधडीला लागणार आहेत. बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल न घेतल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत आमदार सुनील भुसारा यांच्याकडे शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. या अनुषंगाने भुसारा यांनी शनिवारी गावात येऊन शेतकरी आणि महापारेषणचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.
२२० केव्ही तारापूर-बोरिवली आणि बोईसर-घोडबंदर-लीलो कुडूस अशी उच्चदाबाची विद्युतवाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यांतील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता वाहिनीसाठी मनोरे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातच २०१६ मध्ये बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या शेतातून वाहिनी जात असल्यामुळे त्यांचे लागवड क्षेत्र संपुष्टात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी आमदारांना सांगितले.
भुसारा यांच्यासमवेत राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते नरेश आकरे, तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, युवा नेते सुरेश पवार, निखिल पष्टे, कुमार सावंत, नायब तहसीलदार सुनील लहांगे, महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत चौगुले आदी उपस्थित हाेते.
उच्चस्तरीय बैठकीत ताेडगा काढण्याचे आश्वासन
लाेहाेपे गावापासून पुढे वनविभागाच्या जागेतून ही वाहिनी नेल्यास किंवा डाकिवली गावाला वळसा घालून नदीकाठावरून नेल्यास लागवड क्षेत्र बाधित हाेणार नाही, हेही शेतकऱ्यांनी आ. भुसारा यांच्या लक्षात आणून दिले. मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावून यावर मार्ग काढून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन आ. भुसारा यांनी शेतकऱ्यांना दिले.