कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांनी पावणेदोन कोटींची थकबाकी भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:38 AM2021-02-12T04:38:15+5:302021-02-12T04:38:15+5:30
डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला ...
डोंबिवली : कृषिपंपाच्या वीज बिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी महावितरणने प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या महाऊर्जा अभियानाला कल्याण परिमंडळात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभियानाच्या पहिल्या १५ दिवसांतच कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरून तितक्याच रकमेची सवलत मिळवल्याची माहिती गुरुवारी दिली.
या परिमंडळात एकूण २३ हजार ४८८ कृषिपंप ग्राहक असून त्यांच्याकडे २८ कोटींचे वीजबिल थकीत आहे. त्यांतील साडेसहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद असून त्यांच्याकडे आठ कोटी ७८ लाख, तर वीजपुरवठा सुरू असणाऱ्या उर्वरित ग्राहकांकडे १९ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे. पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ, त्यानंतरच्या थकबाकीवर विलंब आकार माफ व प्रचलित दरानुसार आकारलेला व्याजदर या अभियानातील तरतुदींमुळे एकूण थकबाकीच्या रकमेतून दोन कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडलातील शेतकऱ्यांनी २५ कोटी ७५ लाख रुपयांच्या एकूण थकबाकीपैकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८७ लाख रुपये चालू वीज बिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे.
पालघर व ठाणे जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना या अभियानाचा लाभ देण्यासाठी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केले असून ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार वाडा उपविभागातील अंबाडी शाखेत आयोजित मेळाव्यात ४१ शेतकऱ्यांनी २९ लाखांची थकबाकी भरली; तर गुरुवारी सफाळे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित मेळाव्याला ३०० शेतकऱ्यांनी हजेरी लावून वीज बिल थकबाकीतून मुक्त होण्याचा संकल्प केला.
या अभियानाच्या माध्यमातून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील सर्वच २३ हजार ५०० शेतकऱ्यांना त्यांचे वीज बिल शून्यावर आणण्याची संधी उपलब्ध झाली असून तिचा लाभ घेण्याचे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.
-//---------
फोटो आहे