मलंगगड परिसरातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:21 PM2019-11-19T23:21:38+5:302019-11-19T23:21:41+5:30
दीपक केसरकर यांचे आश्वासन; नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी
अंबरनाथ : मलंगगड परिसरातील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासन माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे. केसरकर यांनी मंगळवारी मलंगगड परिसरात शेतीची पाहणी करून शेतकºयांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अंबरनाथ तालुक्यात यंदा अवकाळी पावसाने एकूण ९३ गावांतील २७९९.६२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सहा हजार ९१७ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यातही मलंगगड आणि नेवाळी परिसरातील बहुतांशी जमीन ही संरक्षण विभागाच्या नावावर आहे. याच जमिनी ताब्यात घेण्यावरून दोन वर्षांपूर्वी नेवाळी आंदोलनही पेटले होते. या जमिनी अनेक वर्षांपासून मूळ मालक असलेले शेतकरी कसत आहेत. यंदा अवकाळी पावसाने या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. जमीन नावावर नसल्याने भरपाई मिळणार कशी? असा प्रश्न शेतकºयांना पडला होता. त्यावर शासकीय जमिनी कसत असलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याबाबतची चर्चा झाली असून मलंगगड परिसरातील शेतकºयांनाही यामध्ये गृहीत धरले जाईल, असे आश्वासन यावेळी केसरकर यांनी दिले. यावेळी माजी आमदार विनोद घोसाळकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, चैनू जाधव, संदीप पाटील आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना संपवण्याची खेळी अयशस्वी!
यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. माझ्या स्वत:च्या मतदारसंघात गोव्याचे भाजपचे मंत्री प्रचार करत होते, तसेच राज्यात अनेक ठिकाणी भाजपने अपक्ष उमेदवार उभे केले होते. त्यामुळे अपक्षांच्या जीवावर सरकार स्थापन करत शिवसेनेला संपवण्याची भाजपची खेळी होती. ती अयशस्वी ठरल्याचे केसरकर म्हणाले. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. राणे यांना पक्षात घेणेदेखील शिवसेना संपवण्यासाठीची भाजपची खेळी होती. मात्र, राणे जिथे जातात त्यांचे सरकार जाते. शिवसेनेने राणे यांना मुख्यमंत्री केले तेव्हा शिवसेनेची सत्ता गेली, राणे काँग्रेसमध्ये गेले अन् काँग्रेसची सत्ता गेली. आता भाजपचेही तेच झाल्याचे केसरकर म्हणाले.