किसान सभेच्या लाँग मार्चला तिसऱ्या दिवशीही जोरदार प्रतिसाद !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 06:31 PM2018-03-08T18:31:25+5:302018-03-08T18:31:25+5:30
शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेल्या लाँग मार्चने आज तिसऱ्या दिवशी कसारा घाटातून खाली उतरत मुंबईकडे कूच केले.
कसारा (शहापूर) : शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी 6 मार्च रोजी नाशिक येथून काढण्यात आलेल्या लाँग मार्चने आज तिसऱ्या दिवशी कसारा घाटातून खाली उतरत मुंबईकडे कूच केले. तिसऱ्या दिवशी परिसरातील शेतकरी लाँग मार्चमध्ये सामील झाल्याने नाशिक येथून सामील झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. नाशिक येथून निघालेल्या लाँग मार्चचे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गावांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत होत आहे. गावोगावचे शेतकरी लाँग मार्च मधील शेतकऱ्यांना पाणी पुरवून व फुले देऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.
लाँग मार्च मध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातून तांदूळ व शिधा सोबत आणला आहे. मंगळवारी रात्री रायगड नगर येथील वालदेवी नदी जवळ श्तकऱ्यांनी मुक्काम ठोकला होता. सोबत आणलेल्या भाकरी शेतकऱ्यांनी येथे आपसात वाटून खाल्ल्या. किमान 30 हजार शेतकऱ्यांना रोडवर व आजूबाजूच्या शेतात झोपून मुक्कामाची पहिली रात्र काढली. सकाळी पुन्हा 18 किलोमीटर अंतर पायी चालून लाँग मार्च खंबाळे ता. इगतपुरी येथे पोहचला. येथील तळ्यावर आपल्या बरोबर आणलेला तांदूळ उकडून शेतकऱ्यांनी भोजन केले. बुधवारी रात्री घाटनदेवी ता. इगतपुरी येथे मुक्काम केला. वाडा, शहापूर, ठाणे, पालघर, विक्रमगड येथील हजारो शेतकरी 8 मार्चला आटगाव ता. शहापूर येथे लाँग मार्चमध्ये सामील झाले.
लाँग मार्चच्या पुढे पारंपरिक वाद्ये वाजवण्यात येत आहेत. चळवळीची गाणी गायली जात आहे. घोषणांनी वातावरण दुमदुमून निघत आहे.
किसान सभेचे डॉ अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, विजू कृष्णन, किसन गुजर, डॉ अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, सुभाष चौधरी, सिद्धप्पा कलशेट्टी, बारक्या मांगात, रडका कलांगडा आदी नियोजन व नेतृत्व करत आहेत. महिला शेतकरीही मोठ्या संख्येने सामील झाले आहेत.
प्रत्यक्ष सामील होऊ न शकलेल्या शेतकऱयांनी लॉंग मार्चच्या समर्थनार्थ आपल्या जिल्ह्यात प्रत्येक तहसील कार्यालयावर निदर्शने करून, निवेदने देऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन किसान सभेने केले आहे.