शेतकऱ्यांनाे, आता स्वत:च्या पिकांसह बांधावरील झाडांची माहिती ‘ई पीक ॲप’मध्ये भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:33+5:302021-08-13T04:46:33+5:30
सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपल्या शेतात लागवड, पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना आता उभ्या पिकाची पीकनिहाय, हंगामनिहाय व ...
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपल्या शेतात लागवड, पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांना आता उभ्या पिकाची पीकनिहाय, हंगामनिहाय व क्षेत्रनिहाय माहिती स्वतः भरणे, पिकांच्या नोंदणीबरोबरच जलस्रोतांची साधने, सिंचनाचा प्रकार, बांधावरची झाडे, पालेभाज्या, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस व विहीर, इमारत याचीदेखील नोंद आता ईपीक ॲपमध्ये स्वत:च करावी लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ''ई-पीक'' मोबाईल ॲप''चे आज, शुक्रवारी लोकार्पण करणार आहेत.
यासाठी आता तलाठी व कृषी सहायक यांनी गावपातळीवर कोतवाल, पोलीस पाटील, कृषी मित्र, मोबाईल दूत, धान्य दुकानदार, सेतूचालक, सामाजिक कामात हिरीरीने भाग घेणारे गावांतील प्रमुख व शेतकरी यांच्या मदतीने या ई-ॲपचा प्रचार, प्रसिद्धी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपवर अपलोड केलेल्या पिकांच्या नोदींना तलाठी ई-पीक प्रणालीद्वारे मंजुरी देणार आहे. या ई-पीक पाहणीचे डेमो ॲप व प्रत्यक्ष ॲप वापरासाठी अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गाव स्तरावर तलाठी व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा लागेल. शेतकऱ्यांनी १०० टक्के आपल्या सर्व्हे नंबरनिहाय पिकांच्या नोंदी घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश ज. नार्वेकर यांनी केले आहे.
पिकांची अद्ययावत व खरीखुरी माहिती नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकांचे ''जीओ टॅगेड'' छायाचित्र काढायचे आहे. ते अक्षांश रेखांश, दिनांक व वेळ दर्शवील. शेतकऱ्यांनी नोंदविलेल्या त्यांच्या शेतातील पिकांची माहिती तपासणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आणि नोंदणी केलेल्या पिकाच्या माहितीस मान्यता देण्यासाठी जमाबंदी आयुक्तांमार्फत तलाठ्यांसाठी मिडलवेअर ई-पीक आज्ञावली विकसित केली आहे. या ॲपमध्ये जमिनीचा तपशील जसे की, सर्व्हे क्रमांक, खाते क्रमांक, एकूण क्षेत्र, धारण प्रकार, संयुक्त, वैयक्तिकचा समावेश आहे. पिकांची माहिती ऑफलाईन मोडमध्येही भरण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.