भिवंडीतील काल्हेर कोपर परिसरातील दोस्ती बिल्डर विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
By नितीन पंडित | Updated: December 14, 2024 17:23 IST2024-12-14T17:22:12+5:302024-12-14T17:23:03+5:30
राष्ट्रवादी श.प. गटाचे खासदार बाळ्या मामा यांचे बिल्डरच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन

भिवंडीतील काल्हेर कोपर परिसरातील दोस्ती बिल्डर विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील कोपर काल्हेर परिसरातील दोस्ती गृप या बांधकाम व्यावसायिकाने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मागील अनेक वर्षांपासून न देता जमिनी बळकावल्या असून स्थानिक शेतकऱ्यांना प्रकल्पात कोणतेही काम मिळत असून उलट शेतकऱ्यांवर गुंडांकरवी दादागिरी केली जात असल्याचा आरोप करत शनिवारी स्थानिक शेतकऱ्यांनी कोपर काल्हेर येथील दोस्ती बिल्डरच्या मुख्य प्रवेश द्वारावर आंदोलन केले. या आंदोलनाप्रसंगी भिवंडी लोकसभेचे खा. बाळ्या मामा दाखल होत त्यांनी बांधकाम व्यावसायिक मालकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवले होते. यावेळी बराच वेळ प्रवेशद्वारावर अडवून ठेवत शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या बांधकाम व्यावसायिक मान्य करत नसल्याने संतप्त खासदार बाळ्या मामा यांनी दोस्ती गृप बिल्डरच्या प्रवेश द्वारावर थेट खाली बसून ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका खा. बाळ्या मामा यांनी घेतली होती. पोलिसांनी खासदारांना विनंती करत आंदोलन स्थगित कारण्याची वारंवार विनंती केली,मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना जमिनींचा मोबदला मिळत नाही,स्थानिक शेतकऱ्यांना काम मिळत नाही व येथील गावगुंडांची दादागिरी थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका खा.बाळ्या मामा यांनी घेतली होती.
तब्बल तीन तास सुरू राहिलेल्या आंदोलना शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला आजच्या बाजारभावा नुसार देणे व स्थानिक भूमिपुत्रांना या ठिकाणी काम देणे या मागण्या मान्य केल्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.या आंदोलनात असंख्य शेतकरी व स्थानिक नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
येथील शेतकऱ्यांवर दोस्ती बिल्डरने केलेल्या अन्याया विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण या आंदोलनात सहभागी झालो असून बिल्डर ने दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या पण आज पर्यंत व्यवहार पूर्ण केलेले नाहीत.शेतकरी काम मागायला गेले की ते त्यांना काम न देता माजी खासदारांच्या बंगल्यावर जाण्याचा सल्ला बिल्डर देत असून,येथे त्यांच्या कुटुंबीयांची गुंडांची दादागिरी सुरू आहे.ज्या शेतकऱ्याने जमीन दिली नाही त्याच्या जागेत जबरदस्तीने माती भराव करून नंतर शेतकऱ्यांना उलट तुमची जमीन कोठे आहे ती दाखवा असा प्रश्न केला जातो.
प्रशासनाची मदत घेऊन गुंडांच्या माध्यमातून बिल्डर दादागिरी करीत आहे,त्याला पोलिस प्रशासन ही मदत करीत असून आम्ही या पूर्वी सुध्दा बिल्डर सोबत चर्चा केली परंतु त्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आमच्यावर आंदोलनाची वेळ आली असून आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळे पर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.