शेतकऱ्यांना भाताने मारले, पण कंदमुळांनी तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 12:14 AM2020-11-08T00:14:42+5:302020-11-08T00:14:57+5:30
केवळ भातशेती नव्हे तर कंदमुळांची शेती हा एक पर्याय समोर आला आहे.
- जनार्दन भेरे
भातसानगर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पिके हातची गेल्याने रडकुंडीस आलेली अवस्था झालेली असताना मात्र शहापूर तालुक्यातील नडगाव येथील साखरपाड्यातील शेतकऱ्यांनी लावलेल्या कंदमुळे यांचे अधिक उत्पादन झाल्याने भाताने मारले, पण कंदमुळाने तारले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
केवळ भातशेती नव्हे तर कंदमुळांची शेती हा एक पर्याय समोर आला आहे. अधिक पाऊस पडल्यास मोठ्या प्रमाणात कंदमुळे आणि पाऊस प्रमाणात पडल्यास दोन्ही पिके जोमदार. रताळ्यांंसाठी केवळ त्याला आलेल्या वेली पाणवठ्याच्या जागी ठेवून दुसऱ्या वर्षी ओढलेल्या मातीच्या ओट्यात त्या लावल्या की, पुन्हा उत्पादन सुरू होते. आज बाजारात त्यांना ६० रुपये किलो दर मिळत आहे. चावी ७० ते ८० रुपये किलो, अळू कंद ४० ते ५० रुपये तर करवंदे ६० ते ७० रुपयांना विकली जात असल्याने हे उत्पादन घेणाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत.
तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील साखरपाडा या आदिवासीपाड्यात ९८ कुटुंबे राहत असून ही सर्व कुटुंबे गेल्या १० वर्षे रताळी, चावी, करवंदे यांचे उत्पादन घेत आहेत. या आधी परंपरागत पद्धतीने केवळ सणावाराला उपवासासाठी लागतात म्हणून तितक्याच प्रमाणात त्यांचे उत्पादन केले जात होते. मात्र, गेल्या १० वर्षांंपासून प्रत्येक शेतकरी व्यापारी तत्त्वावर आधारित रताळी, चावी, करवंदे यांची शेती करून कमाई करीत आहे. पाड्यातील पंढरीनाथ रेरा म्हणाले की, मला या वर्षी कमीतकमी लाख ते सव्वा लाख रुपयांची रताळी, ७० ते ८० हजारांची चावी, ५० हजारांंची करवंदे असे उत्पन्न मिळेल.