आषाढीसाठी उपवासाचे स्टफ पॅटीस, साबुदाणा केशर खीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:07 AM2019-07-11T00:07:11+5:302019-07-11T00:07:17+5:30
एकादशीसाठी उपाहारगृहांची तयारी : साबुदाणा खीर मिळणार मातीच्या भांड्यांमध्ये, रुचकर थालीपीठाला खवय्यांची पसंती
ठाणे : आषाढी एकादशीनिमित्त उपाहारगृहांत उपवासाच्या पदार्थांची चंगळ दिसून येणार आहे. फळांसोबत साबुदाणा, शेंगदाणे, रताळे आणि खजुरापासून बनवलेले उपवासाचे पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ या म्हणीनुसार उपवासाच्या पदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय्यांसाठी यानिमित्ताने उपवास स्टफ पॅटीस आणि उपवास साबुदाणा केशर खीर हे दोन पदार्थ मेन्यूमध्ये असणार आहे.
आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांचा मोठा उत्सव. या दिवशी भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. परंतु ज्यांना आपल्या कामामुळे पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही, असे भाविक आपापल्या शहरांत एकादशी भक्तिभावाने साजरी करतात. या पार्श्वभूमीवर बाजारपेठदेखील सज्ज झाली असून, फळे, दूध, फुले, उपवासाचे साहित्य यांचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. या दिवशी बहुतांश भाविक उपवास करीत असतात. हल्ली उपवासाचे पदार्थ हे रेडिमेडच आणले जातात. अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच पदार्थ घरी बनविले जातात. त्यात साबुदाणा खिचडी, वºयाची खिचडी, साबुदाण्याचे वडे यासारख्या पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे उर्वरित पदार्थ खवय्ये बाहेरूनच आणतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेता त्यानुसार उपाहारगृहांत पदार्थ बनविले जातात. काही पदार्थ हे त्याच दिवशी, तर काही पदार्थ आदल्या दिवशीपासून उपलब्ध करून दिले जातात. यातच एकादशीला थालीपीठ, उपवासाची मिसळ, उपवासाची कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल यासारख्या पदार्थांना अधिक मागणी असते.
उपवासाच्या भाजणीपासून तयार करण्यात आलेल्या रुचकर आणि चविष्ट अशा थालीपीठलाही खवय्ये चांगलीच पसंती देतात. नेहमीप्रमाणे उपवास बटाटावडा, उपवास साबुदाणा बटाटा पुरी, उपवास पुरीभाजी, उपवास थाळी, खरवस, मसाला दूध, पीयूष/लस्सी यासारखे पदार्थ उपलब्ध आहेत. खवय्यांना उपवासाचे नावीण्यपूर्ण पदार्थ मिळावेत, यासाठी उपवास स्टफ पॅटीस आणि गोड पदार्थांत उपवास साबुदाणा केशर खीर बनविण्यात येणार असल्याचे उपाहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले.
आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांना चांगली मागणी असते. त्या दिवशीच उपाहारगृहांत येऊन ते पदार्थ खाल्ले जातात, अन्यथा पार्सलही नेतात. आदल्या दिवशी फक्त उपवासाचे ड्राय स्नॅक्सच घेऊन जातात.
- केदार जोशी,
उपाहारगृहाचे मालक