महापालिका मुख्यालय बाहेर दिव्यांगांचे आमरण उपोषण
By धीरज परब | Published: September 13, 2023 07:46 PM2023-09-13T19:46:15+5:302023-09-13T19:46:22+5:30
दिव्यांगांवर अन्याय आणि अत्याचार केला जातोय असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला .
मीरारोड - विविध मागण्यांसाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांगांनी आमरण उपोषण सुरु केले आहे .
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांग क्रांती आंदोलनाचे महाराष्ट्र महासचिव डॉ . रामदास खोत , मीरा भाईंदर अध्यक्ष सुदाम अहिरे , महिला अध्यक्ष काजल नाईक , कार्याध्यक्ष बाबाजी भिसे , उपाध्यक्ष गौरव खैरनार आदींसह दिव्यांगांनी १३ सप्टेंबर रोजी महापालिके बाहेर आंदोलन सुरु केले . गेल्या अनेक वर्षां पासून महापालिकेस पत्र व्यवहार करून देखील कार्यवाही केली जात नाही . दिव्यांगांवर अन्याय आणि अत्याचार केला जातोय असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला .
शहरात नाक्या नाक्यावर सेल्फी पॉईंट साठी काही कोटी खर्च केले . परंतु दिव्यांगांना उपजीविकेसाठी स्टॉल देण्यास मात्र पालिका आडकाठी आणते . दिव्यांग मूकबधिर यांना शाळे साठी मुंबईत जावे लागते . शहरात सुमारे साडेचार हजार दिव्यांग असून त्यांच्यासाठी मीरा भाईंदर शहरात शाळा सुरु करण्यास पालोक टाळाटाळ करत आली आहे .
मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क येथे १५ वर्षां पेक्षा जास्त काळा पासून दिव्यांग रहात रहात असून त्यांना शासन धोरणा प्रमाणे ३७५ चौ. फु. चे पक्के घर देण्या ऐवजी झोपड्या तोडण्याच्या नोटीस पालिका देते . काही दिव्यांगांना तात्पुरत्या स्वरूपात इमारतीत शिफ्टिंग सिली असली तरी इमारतीची लिफ्ट नेहमी बंद असणे , अस्वच्छता आदी कारणांनी त्यांचे हाल होत आहेत . त्यामुळे दिव्यांगांना आवश्यक सुविधांची घरे देण्याची मागणी असल्याचे आंदोलक म्हणाले . दिव्यांगांना रोजगार देणे , फेरीवाला पावती माफ करणे , दिव्यांगांना उपकरणे व वाहने द्यावीत अशा मागण्या केल्या .
महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली . मात्र ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले .