भिवंडीत मनसे कामगार सेनेचे पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण
By नितीन पंडित | Published: November 1, 2022 06:29 PM2022-11-01T18:29:33+5:302022-11-01T18:30:35+5:30
मनसेने केलेल्या उपोषण आंदोलनात मनपा प्रशासनाने कामगारांना लागू केलेला सातवा वेतन शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे व अटी शर्तीनुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात यावी
नितीन पंडित
भिवंडी : भिवंडी महानगर पालिकेमधील शेकडो कामगारांवर प्रशासना कडून अन्याय होत असून नियम व शर्तीचा भंग करून पालिकेचा कारभार सुरू असल्याचा आरोप करत त्याविरोधात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे भिवंडी युनिट अध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालय समोर मनसेने आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. कामगारांच्या प्रश्नांवर गेल्या वर्षभरापासुन प्रशासनाला निवेदन देऊन व आंदोलन करूनही कामगारांना न्याय मिळत नसल्याने कामगारांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत त्यासाठी हे आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती साळवी यांनी दिली आहे.
मनसेने केलेल्या उपोषण आंदोलनात मनपा प्रशासनाने कामगारांना लागू केलेला सातवा वेतन शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे व अटी शर्तीनुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात यावी, अश्वशित प्रगती योजना तात्काळ लागू करावी, अश्वशित प्रगती योजनेचे बारा,चोवीसचे सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावी,२००५ नंतर सेवेमध्ये रुजू झालेले कर्मचारी यांची ०१ जानेवारी २०१९ पासून पेन्शन कॉन्ट्रीब्युशन मध्ये शासन निर्णयाप्रमाणे ४ टक्के वाढीव रक्कम फरकासह कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यामध्ये जमा करावी,कर्मचाऱ्यांची एल.आय.सी नियमाप्रमाणे चालू करण्यात यावी,कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, न्यायालयाच्या निर्णयानुसार भिवंडी शहरात सन २०२३-२४ व त्यापुढे बकरी ईद सणा निमित्त जनावरांची कत्तल करुन अपशिष्ट उचलण्याचे काम सफाई कर्मचारी यांना आदेश निर्गमित करु नये व ती अपशिष्ट उचलण्याचे काम हे ठेकापध्दतीने देण्यात यावे.प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार होत असून त्याची चौकशी करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी मनसेने मुख्यालयासमोर उपोषण आंदोलन केले असल्याची माहिती संतोष साळवी यांनी दिली आहे.