मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला, ३ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 07:37 PM2023-11-23T19:37:28+5:302023-11-23T19:37:51+5:30

महामार्गावर मेंढवनला भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, दोन जखमी, मृतांमध्ये एका रत्नागिरीकराचा समावेश

Fatal accident on Mumbai-Ahmedabad highway; Put a spell on the family in Pune | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला, ३ मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला, ३ मृत्यू

शशिकांत ठाकूर

पालघर (कासा) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंढवन येथे गुरुवारी दुपारी कारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले हे कुटुंब पुण्याचे असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

या अपघातात मिलिंद दिनकर वैद्य (वय ५३, रा. रत्नागिरी), हर्षद विश्वास गोडबोले (वय ४३, रा. शिवाजीनगर, पुणे), आनंदी हर्षद गोडबोले (वय ५) यांचा मृत्यू झाला आहे. तर हर्षदा हर्षद गोडबोले (वय ३९) आणि अद्वैत हर्षद गोडबोले (वय १३) हे जखमी झाले आहेत. हर्षद गोडबोले हे टाटा मोटर्समध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर होते, तर मिलिंद वैद्य हे हर्षद यांच्या बहिणीचे पती (भावोजी) आहेत.

गुजरातकडून मुंबईकडे गुरुवारी दुपारी टाटा कार जात असताना मेंढवन येथील तीव्र वळणावर कारचालकाचे नियंत्रण सुटून मुंबई लेनवरून कठडा ओलांडून विरुद्ध बाजूवरील समोरून येणाऱ्या टँकरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून मिलिंद वैद्य हे कार चालवत होते.

भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूककोंडी
पुण्यातील गोडबोले कुटुंब गुजरात येथून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांची कार मेंढवण येथील अपघाती वळणावर आली असताना हा भीषण अपघात झाला. लहान मुलगी आनंदी हिला गंभीर अवस्थेत कासा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. गंभीर जखमी हर्षला गोडबोले हिला कासा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमी अद्वैत यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले आहेत. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती.

Web Title: Fatal accident on Mumbai-Ahmedabad highway; Put a spell on the family in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.