उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलिसावर ब्लेडने जीवघेणा हल्ला; आरोपी जेरबंद
By सदानंद नाईक | Published: September 26, 2024 09:46 PM2024-09-26T21:46:59+5:302024-09-26T21:48:13+5:30
ठाण्यात रक्ताचा सडा
सदानंद नाईक, उल्हासनगर: विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका नशेखोराने गुरवारी सकाळी धिंगाणा घालत महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर ब्लेडने वार केल्याची घटना उघड झाली. पोलिसांनी नशेखोर बाबासाहेब सोनावणे याला अटक केली असून गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुरवारी सकाळी एक नशेखोर येऊन त्याने तक्रार घेण्याची मागणी करीत धिंगाणा घातला. यावेळी अचानक ब्लेड काढून महिला पोलीस कर्मचारी शितल कांबळे यांच्यावर सपासप वार करणे सुरू केले. याप्रकाराने एकच खळबळ उडून पोलीस ठाण्यात या हल्ल्याने रक्ताचा सडा पडला होता. नशेखोर इसमाचे नाव बाबासाहेब सोनावणे असून त्याला अटक करून सरकारी कामात अडथळा करणे, हत्येचा प्रयत्न करणे आदी कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचारी शीतल कांबळे यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर खुनी हल्ला झाला. या घटनेने हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार घटनेची आठवण शहरवासीयांना झाली. याबाबत सहायक पोलिस आयुक्त अजय कोळी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मुख्यमंत्री बंदोबस्त कार्यक्रमात असल्याचे सांगून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच याबाबत कोणताच पोलीस अधिकारी व कर्मचारी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. एकूणच पोलीस प्रचंड दडपणाखाली असल्याचे चित्र पोलीस ठाण्यात दिसले.