मेट्रोमुळे घोडबंदर पट्यातील चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:07 PM2018-01-31T16:07:43+5:302018-01-31T16:10:21+5:30
एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पाठविलेल्या पत्रामुळे घोडबंदरच्या प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जो पर्यंत मेट्रोचा आराखडा तयार होत नाही, तो पर्यंत या पुलांचे काम सुरु न करण्याच्या सुचना त्यांनी पालिकेला केल्या आहेत.
ठाणे - घोडबंदर रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी येथील नागरीकांनी वारंवार पादचारी पुलांची मागणी लावून धरली आहे. त्यानुसार काही पादचारी पुल तयार झाले असून काही प्रस्तावित करण्यात आले आहेत. परंतु आता जोपर्यंत मेट्रोचा आराखडा येत नाही, तो पर्यंत या प्रस्तावित पादचारी पुलांचे काम थांबविण्याच्या सुचना एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर पट्यात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली असून जवळपास ५ लाख नागरीकांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. घोडबंदर रोड हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रोडवरून वेगाने वाहने येत असतात. यामध्ये मोठ्या आणि अवजड वाहनांचा देखील समावेश आहे. नोकरीला जाणारे, शाळकरी मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना अतिशय मोठा असलेला हा घोडबंदर रोड आपला जीव धोक्यात घालून ओलांडावा लागतो. रस्ता ओलांडताना यापूर्वी या रोडवर अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी या रोडवर पादचारी पूल बांधण्याची मागणी ठाण्यातील दक्ष नागरिक आणि ठाणेकरांनी केली होती. त्यानुसार महापालकेच्या वतीने घोडबंदर पट्ट्यात पादचारी पुलाची कामे सुरु करण्यात आली आहे. आर मॉल आणि तत्वज्ञान विद्यापीठ येथील पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून तो पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. तर कासारवडवली येथील प्रस्तावित असलेल्या पादचारी पुलाचे ठिकाण बदलण्यात आले असून हा पादचारी पूल आता सुरज पंचामृत ( सुरज वोटर पार्क ) येथे बांधण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी केबल हलवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
दोन पादचारी पुलांची कामे पूर्ण झाली असली तरी, आणखी चार पादचारी पूल प्रस्तावित करण्यात आले असून या पुलाचे काम देखील लवकरच सुरु करण्यात येणार होते. यामध्ये आनंदनगर, मूच्छाला कॉलेज, भार्इंदर पाडा तसेच ओवळा अशा चार ठिकाणी पादचारी पुल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या कामासाठी २० कोटींचा निधी प्रास्तवित करण्यात आला आहे. मात्र आता या पुलाच्या कामाला एमएमआरडीएनेच ब्रेक लावला असून या चारही पादचारी पुलाच्या कामाची प्रक्रि या काही काळ थांबवावी असे एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पत्र पाठविले आहे. भविष्यात या या मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोचा चौथा टप्प्याला हे पादचारी पूल अडथळा ठरू शकतात. मेट्रोच्या आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरु असून त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मेट्रोचा आराखडा तयार होत नाही तोपर्यंत महापालिकेला हे काम थांबवावे लागणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप सुरु वात करण्यात आली नसून निविदा प्रक्रिया देखील झालेली नाही. एमएमआरडीएकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले असून पुढील सूचना मिळेपर्यंत काम कामाची प्रक्रि या थांबवावी लागणार आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. परंतु मेट्रोचा आराखडा आला आणि त्यात हे पुल नकोच असा उल्लेख झाला तर मात्र या पुलांचे भवितव्य अधांतरी राहणार असल्याचेही आता बोलले जात आहे.