भिवंडीतील नाट्यरसिकांच्या नशिबी तीन वर्षांपासून उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:53 PM2020-12-15T23:53:20+5:302020-12-15T23:53:23+5:30
नाट्यगृह बंद : दहा कोटींचा निधी मंजूर होऊनही मिळाली नाही दमडी
- नितीन पंडीत
भिवंडी : भिवंडी परिसरातील नाट्य रसिकांच्या करमणुकीसाठी महापालिकेने उभारलेले एकमेव नाट्यगृह स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्तीकरिता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी तो अद्याप महापालिकेस प्राप्त झालेला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी होताच ठाणे, कल्याण येथील नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग सुरू झाले. मात्र, भिवंडीत नाट्यगृह असूनही नाटकांचे प्रयोग होऊ शकत नसल्याने येथील नाट्य रसिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.
स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन या नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र, गेंड्याची कातडी असलेल्या भिवंडी महापालिका प्रशासनास त्याची काहीही चिंता वाटत नसल्याचे नाट्यरसिकांचे म्हणणे आहे. कोरोना संकटाच्या आधी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, निधी मंजूर होऊनही या नाट्यगृहाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. भिवंडी महापालिकेने नागरिकांच्या करमणुकीसाठी १९९५-९६ साली भव्य नाट्यगृह बांधले. राज्यात प्रथमच शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. याच कालावधीत तत्कालीन भिवंडी नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता होती. गेल्या २४ वर्षांच्या कालावधीत या नाट्यगृहाची दुरवस्था झाली असून, सध्या बंद पडले आहे. भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील नाट्यरसिकांचा त्यामुळे हिरमोड झाला असून, होतकरू व नवकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत नसल्याने त्यांचीही अडचण झाली आहे. भिवंडीतील रसिकांना नाटक व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी कल्याण, ठाणे, मुंबई या ठिकाणी जावे लागत आहे. ही बाब खर्चिक व वेळकाढू असल्याने, अनेकदा भिवंडीतील नाट्यरसिकांना मन मारावे लागते.
नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, तरी वास्तूची दुरवस्था झाल्याने नाट्यगृह बंद आहे. येत्या ६ जानेवारी रोजी स्व. मीनाताई ठाकरे यांची जयंती साजरी होणार असून, राज्यात शिवसेनेचे ‘ठाकरे सरकार’ सत्तारुढ असताना त्यापूर्वी नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी आहे.
नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, त्याचे हस्तांतरण अजूनही भिवंडी महापालिकेकडे झालेले नाही. त्यामुळे नाट्यगृह दुरुस्तीचे सुरू झालेले नाही. या निधीसाठी शासकीय स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे. निधी मनपाकडे हस्तांतरित झाल्यावर लागलीच दुरुस्ती करण्यात येईल.
- डॉ. पंकज आशिया,
आयुक्त, भिवंडी महापालिका