भाईंदरजवळ लोकल खाली वडील आणि मुलाने केली आत्महत्या

By धीरज परब | Published: July 9, 2024 06:38 PM2024-07-09T18:38:14+5:302024-07-09T18:39:09+5:30

ते वसईचे राहणारे होते. 

father and son ends life near bhayandar  | भाईंदरजवळ लोकल खाली वडील आणि मुलाने केली आत्महत्या

भाईंदरजवळ लोकल खाली वडील आणि मुलाने केली आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदर रेल्वे स्थानकाच्या आधी विरार वरून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल खाली आत्महत्या करणारे दोघेजण हे वडील आणि मुलगा असल्याचे स्पष्ट झाले असून ते वसईचे राहणारे होते . 

सोमवारी सकाळी ११ . ३० च्या सुमारास चौथ्या क्रमांकाच्या जलद मार्ग रेल्वे रुळावर विरार वरून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकलच्या खाली दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती . एकाच लोकल खाली दोघांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती . लोकलच्या गार्डने घटनेची माहिती भाईंदर रेल्वे स्थानकात दिली . 

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघांच्या डोक्या वरून लोकल गेल्याने डोके छिन्न विच्छिन्न झाले होते . दोघांचे मृतदेह भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी शव विच्छेदन गृहात पाठवण्यात आले . दोघांची ओळख पातळी नसल्याने सोमवारी रात्री दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले . 

रेल्वेच्या सीसीटीव्ही मध्ये दोघेही फलाट वरून एकत्र जाताना दिसून आले आहेत . शिवाय रेल्वे रुळावर डोके ठेऊन झोपताना देखील फुटेज मध्ये आढळून आले आहे .  दरम्यान वसई रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतांची ओळख पटवण्यास सुरवात केली . त्यात पोलिसांना आढळलेल्या आधार कार्ड वरून हरीश मेहता ( ६० ) आणि जय मेहता ( ३२ ) अशी मृतांची ओळख पटली . हरीश व जय हे वडील आणि मुलगा असून ते नालासोपारा - वसई दरम्यानच्या वसंत नगरी भागात राहणारे होते . 

वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले कि , आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . त्याचा तपास सुरु आहे .  हरीश हे  पूर्वी शेअर मार्केट चे काम करायचे तर जय हा एका शीतपेय कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता . हरीश यांच्या पत्नीचे निधन झाले असून जय यांचे वर्षभरा पूर्वी लग्न झालेले आहे . 

मंगळवारी सायंकाळी वडील हरीश आणि मुलगा जय यांचे मृतदेह घेण्यासाठी त्यांचे नातलग हे भाईंदरच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयातील शवागार मध्ये आले . तेथून दोघांचे मृतदेह त्यांनी ताब्यात घेतले . 

Web Title: father and son ends life near bhayandar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.