अकरा वर्षांच्या मुलीसह वडिलांची आत्महत्या; पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी झाली हाेती शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:31 AM2022-03-17T11:31:43+5:302022-03-17T11:31:55+5:30
विकासवर त्याची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होता.
शहापूर : आसनगाव येथे राहणारे विकास सूर्यकांत केदारे (३९) यांनी मंगळवारी निर्मळनगर येथील राहत्या घरी ११ वर्षांच्या शाळकरी मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विकासवर त्याची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होता. गेल्यावर्षी १५ ऑगस्टला त्याची पत्नी मोनाली हिने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. मोनालीच्या माहेरच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीवरून विकास व विकासची आई पुष्पलता यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली होती. विकासची बहीण शिल्पा शिरसाठ यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपासून विकास, आई पुष्पलता व भाची आर्या हे आमच्याकडे उल्हासनगर येथे राहत होते. विकास हा अटक झाल्यापासून नैराश्येत होता.
जेलमधून सुटल्यानंतर तो अधूनमधून आसनगावला निर्मळनगर येथील त्याच्या घरी ये-जा करीत हाेता. मंगळवारी सकाळी १० वाजता, मॉलमध्ये जातो असे सांगून विकास मुलगी आर्यालाही सोबत घेऊन गेला. पण सायंकाळी ५ वाजले तरी ते दाेघे उल्हासनगरला न परतल्यामुळे मोबाइलवरून संपर्क केला, मात्र त्याचा मोबाइल बंद होता. त्यानंतर आर्या हिच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता शेजारच्या महिलेने मोबाइल उचलला. तिने, आर्याने चार्जिंगसाठी माेबाइल आमच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेला विकासच्या घरी जायला सांगितले. तिने घरी जाऊन पाहिले असता, खिडकीतून विकास आणि आर्या यांनी गळफास घेतल्याचे दिसले. याप्रकरणी शहापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे अधिक तपास करीत आहेत.
पाेलीस तपासावर बाेट
काेणताही गुन्हा नसताना आपल्याला आणि आपल्या वयोवृद्ध आईला शिक्षा केल्याचा आरोप त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. शहापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यावर बोट ठेवले आहे. माझ्यासोबत विश्वासघात झाला असून आता सहन होत नाही. माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचे माझे स्वप्न होते. आर्याकडे पाहून उभे राहण्याचा प्रयत्न केला. पण, असह्य होत आहे. आर्या आणि मी स्वतःच्या मर्जीने जीवन संपवित असल्याचे विकासने या चिठ्ठीत लिहिले आहे.