मुलगी इटलीहून भारतात परतल्याने वडिलांनी मानले सरकारचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 02:27 AM2020-03-19T02:27:51+5:302020-03-19T02:28:27+5:30

सरकार ज्या तत्परतेने तिची काळजी घेत आहे, ते पाहून ती माझी मुलगी असली, तरी या कालावधीत तिचे पालक म्हणून सरकार जबाबदारी पार पाडत आहे, अशा भावना ठाण्यातील सुजय कदम यांनी व्यक्त केल्या.

The father regards the government for the daughter returns from Italy to India | मुलगी इटलीहून भारतात परतल्याने वडिलांनी मानले सरकारचे आभार

मुलगी इटलीहून भारतात परतल्याने वडिलांनी मानले सरकारचे आभार

Next

ठाणे : जगभरात उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे इटलीहून भारतात येणे माझ्या मुलीसाठी कठीण दिसत होते. परंतु, भारत सरकारने माझ्या मुलीला भारतात परतण्यासाठी जी मदत केली, त्याबद्दल मी ऋणी राहील. ती भारतात सुखरूप आली, हे पाहून माझ्या जीवात जीव आला. सरकार ज्या तत्परतेने तिची काळजी घेत आहे, ते पाहून ती माझी मुलगी असली, तरी या कालावधीत तिचे पालक म्हणून सरकार जबाबदारी पार पाडत आहे, अशा भावना ठाण्यातील सुजय कदम यांनी व्यक्त केल्या.
पाचपाखाडी येथे राहणारी संजना कदम ही इटली येथे ४ फेब्रुवारी २०२० ला उच्च शिक्षणासाठी गेली. तेथे गेल्यानंतर तिचे २० फेब्रुवारी रोजी महाविद्यालय सुरू होणार होते. इटलीची राजधानी मिलान येथे ती वास्तव्यास होती. जिथे भाडेतत्त्वावर रूम घेतली, त्यांनीही चार महिन्यांचा करारनामादेखील केला. परंतु, कोरोनाचे संकट यायला सुरुवात झाल्यावर दर सात दिवसांनी सांगायचे की, महाविद्यालय काही दिवसांनी सुरू होईल. यादरम्यान महाविद्यालयाने आॅनलाइन अभ्यास सुरू केला. १० मार्च रोजी तेथील सुपर मार्केटही बंद करण्यात आले. संजनाकडे १५ दिवसांचा अन्नसाठा होता. तिने आपले वडील सुजय कदम यांना ही परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी तिला तातडीने भारतात निघून येण्यास सांगितले. परंतु, प्रवास करायचा असेल तर तुम्ही कोरोनामुक्त आहात, असे प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे भारतीय दूतावासाच्या वेबसाइटवर माहिती देण्यात आली होती. त्यावेळी वडील कदम यांनी भारतीय दूतावासाला पत्र लिहिले व त्यात सांगितले की, ‘माझी मुलगी इटलीमध्ये अडकली असून तिला प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत करा,’ आणि संजनाची माहितीही देण्यात आली. १२ मार्च रोजी कदम यांनी त्यांना ई-मेल केला होता. त्यावेळी भारतीय दूतावासाने मिलान दूतावासाशी संपर्क केला आणि मिलान दूतावासाने १३ मार्च रोजी संध्याकाळी संजनाला संपर्क करून दुसऱ्या दिवशी भारतात जाण्यासाठी विमान तयार आहे, असे सांगितले. १४ मार्च रोजी रात्री ८ वाजता ती विमानात बसून १५ मार्च रोजी भारतात परतली.

विमानातही तिच्यासह इतर प्रवाशांचीही विशेष काळजी घेण्यात आली. नवी दिल्लीत आल्यावर तिला आयटीबीपी रुग्णालयात ठेवण्यात आले. तिची तपासणी केली, त्यावेळी तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत.

पुढील १२ दिवस तिला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. भारतात कोरोनासंदर्भात जितक्या तत्परतेने कार्यवाही केली जाते, तितकी इटलीमध्ये नाही. भारतीय दूतावासाने स्वजबाबदारीवर तिला भारतात आणले, असे कदम यांनी सांगितले.

Web Title: The father regards the government for the daughter returns from Italy to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.