अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला कारावास
By जितेंद्र कालेकर | Published: April 11, 2024 09:51 PM2024-04-11T21:51:22+5:302024-04-11T21:51:40+5:30
ठाणे न्यायालयाचा निकाल : भाईंदरमधील घटना
ठाणे : आपल्याच स्वत:च्या १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४२ वर्षीय पित्याला पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे.
भाईंदर पश्चिमेकडील उत्तन नाका भागात ७ जानेवारी २०१८ रोजी हा घृणास्पद प्रकार उघड झाला होता. मुलीच्या ४२ वर्षीय आईला याची माहिती मिळाल्यानंतर तिने उत्तन सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जुलै २०१७ ते ७ जानेवारी २०१८ या कालावधीत वेगवेगळ्या कारणाने जवळ घेत आरोपीने तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलीला मारण्याचीही धमकी त्याने दिली होती.
७ जानेवारी रोजीही तो असाच प्रकार करीत असताना तिने घाबरून शेजाऱ्यांच्या घरात पळ काढला. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मुलीच्या आईने पतीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या खटल्याची सुनावणी १० एप्रिल २०२४ रोजी ठाणे न्यायालयात झाली. ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि विशेष पोस्को न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी मानून पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली.