Father's Day: मुलांनी केले पित्याचे स्वप्न साकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 12:52 AM2019-06-16T00:52:20+5:302019-06-16T00:52:45+5:30
पोलीस दलाकडून खेळताना ज्युदोमध्ये सुवर्णमय कामगिरी
ठाणे : देशसेवेसाठी लष्करात जाण्याचे स्वप्न साकार न झाल्याने देवीसिंग राजपूत यांनी आपल्या मुलांना ज्युदोचे प्रशिक्षण दिले. त्यातील तीन मुलांनी पोलीस दलाकडून खेळताना राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदके मिळवून वडिलांची देशसेवेची इच्छा पूर्ण केली.
राजपूत यांनी प्रशिक्षकाचा वसाच जोपासला आहे. त्यांची तीन मुले शहर पोलीस दलात स्पोर्टस्मन कोट्यातून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ज्युदोपटू आंतरराष्ट्रीय पातळी खेळत आहेत.
राजपूत हे मूळ उत्तराखंडातील गांगोली हाट येथील रहिवासी असून त्यांचे वडील लष्करी सेवेत होते. ती सेवा पूर्ण केल्यावर ते महाराष्टÑ परिवहन महामंडळ सेवेत रूजू झाले. याचदरम्यान ते ठाण्यात वास्तव्याला आले आणि ठाणेकर झाले. हेमलता, लता, हर्षा, विद्या आणि देवकी या पाच मुलींसह भूपेंद्रसिंग अशी त्यांना सहा मुले आहेत. त्यांना ज्युदोचे प्रशिक्षण दिले. त्यातून लता, देवकी आणि भूपेन्द्र हे तिघे पोलीस दलात स्पोर्टस्मन कोट्यातून भरती झाले आहेत. अशाप्रकारे देशसेवेचे त्यांचे स्वप्न या तीन मुलांनी पूर्ण केले आहे.