सदोष गतिरोधक ठरताहेत डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:37+5:302021-05-08T04:42:37+5:30
डोंबिवली : भरधाव वाहन चालवणाऱ्यांना लगाम बसावा आणि अपघात टळावेत, यासाठी शहरातील रस्त्यांवर गतिरोधक बसविले जातात. मात्र, गतिरोधक ...
डोंबिवली : भरधाव वाहन चालवणाऱ्यांना लगाम बसावा आणि अपघात टळावेत, यासाठी शहरातील रस्त्यांवर गतिरोधक बसविले जातात. मात्र, गतिरोधक योग्य पद्धतीने न बसविल्याने ते वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. गतिरोधकाची एकूण पद्धत पाहता ते अपघात टाळण्यासाठी की घडवून आणण्यासाठी बसविले आहेत, असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.
गेली अडीच वर्षे विकासकामांमुळे खोदलेले ठाकुर्ली पूर्वेतील ९० फूट आणि रेल्वे समांतर रस्ते सध्या डांबरीकरणाने सुस्थितीत करण्यात आले आहेत. कल्याणहून डोंबिवलीकडे जाणाऱ्या मार्गाच्या लगत मोठमोठी संकुले असल्याने काही ठिकाणी पुन्हा नव्याने गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुतेक गतिरोधक योग्य पद्धतीने तयार केलेले नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतिरोधकावर काळे-पांढरे पट्टे व गतिरोधक दर्शक फलक असणे गरजेचे असते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
दरम्यान, हे चित्र ठाकुर्ली आणि डोंबिवली शहरातील बहुतांश रस्त्यांवर दिसून येते. परिणामी गतिरोधकाची माहिती मिळत नाही. त्यामुळे अचानक समोर आलेल्या गतिरोधकांवरून भरधाव वाहन उडून अपघात होऊ शकतो. काही ठिकाणी काळे-पांढरे पट्टे मारले आहेत; परंतु ते पुसट झाल्याने रात्रीच्या वेळेस गतिरोधक दिसत नाहीत. ठाकुर्लीतील म्हसोबा चौक ते हनुमान मंदिरादरम्यानच्या रस्त्याचेही डांबरीकरण करण्यात आले आहे; परंतु तेथे बसविलेल्या गतिरोधकांवरही काळे-पांढरे पट्टे मारलेले नाहीत.
---------------
ड्रेनेजची झाकणे खोलात
रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांमध्ये रस्त्यांमधील ड्रेनेजची झाकणे खोलवर गेली आहेत. त्यामुळे खड्डा निर्माण झाला आहे. त्यात भरधाव वाहने आदळून अपघात होत आहेत. काही ठिकाणी ड्रेनेजची झाकणे रस्त्यांच्या वर आल्याने तीदेखील अडथळा ठरत आहेत. त्यामुळे केडीएमसीकडून रस्त्याची बांधणी करताना किंवा त्यावर डांबर टाकताना नियमांचे पालन केले जाते की नाही, असा प्रश्न वास्तव पाहता उपस्थित होत आहे.
-------------------------