भिवंडीतील गोदामावर एफडीएचा छापा
By admin | Published: May 28, 2017 01:48 AM2017-05-28T01:48:03+5:302017-05-28T01:48:03+5:30
मुंबईतील मेसर्स पीओमा केमिकल्स या कंपनीकडून अवैधरीत्या चीनमधून औषधांची आयात केली जात होती. या कंपनीच्या भिवंडीतील गोदामावर एफडीएने छापा
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील मेसर्स पीओमा केमिकल्स या कंपनीकडून अवैधरीत्या चीनमधून औषधांची आयात केली जात होती. या कंपनीच्या भिवंडीतील गोदामावर एफडीएने छापा टाकत, लॅक्टिटोल मोनोहायड्रेट या औषधांचा १२ हजार ७३० किलो साठा जप्त केला.
जप्त मालाची किंमत ४० लाख आहे. हा साठा प्रतिबंधित करण्यात आला असून, आता या प्रकरणाची तक्रार थेट केंद्रीय औषध नियंत्रकाकडे करण्यात आली असल्याची माहिती, एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे. त्यानुसार, आता पुढील कारवाई केंद्रीय औषध नियंत्रकांकडून करण्यात येणार आहे.
पीओमा केमिकल्स कंपनीकडून अवैधरीत्या औषधांची आयात केली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार, एफडीएने ही कारवाई केली.
चीनमधील एका कंपनीकडून हे औषध आयात करण्यात आले होते, तर सन फार्मा, मेडली फार्मा, तिरूपती मेडिकेअर अशा कंपन्यांना हे औषध उत्पादनासाठी विकले जात असल्याचेही तपासणीत समोर आल्याचे डॉ. कांबळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.
ज्या कंपन्यांना हे औषध विकले आहे, त्या कंपन्यांनाही एफडीएने नोटीस बजावली आहे, तर औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचबरोबर, ज्या राज्यात औषध विकले गेले आहे, त्या राज्यांच्या औषध नियंत्रकांनाही याबाबतची चौकशी करण्याच्या सूचना महाराष्ट्र एफडीएकडून देण्यात आल्या आहेत.