कल्याण-शीळ महामार्गावरील ‘त्या’ दुभाजकांमुळे अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:45 AM2019-04-26T00:45:04+5:302019-04-26T00:45:13+5:30
नव्या दुभाजकांचे काम पूर्ण, वाहतुकीलाही अडथळा
डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावर काटई सिग्नलनंतर शीळकडे जाताना देसाई पुलानजीक रस्त्यावर नवे दुभाजक बसवण्याचे काम एमएसआरडीसीने पूर्ण केले आहे. मात्र, त्याठिकाणी जुने दुभाजक नव्या दुभाजकाच्या बाजूलाच ठेवल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. वाहतूककोंडीमुळे प्रवासादरम्यान वाहनचालक त्रस्त असतानाच जुने दुभाजक अडथळा ठरत आहेत.
वाहतुकीला अडचण होऊ नये, यासाठी ते तातडीने काढावेत, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. नव्याने केलेल्या कामाला वाहनांमुळे धक्का लागू नये, यासाठी काही अंतरांवर जुने दुभाजक ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी गर्दीच्या वेळेत अपघात झाल्यास त्यात वाहनांचे आणि वाहनचालकांचे नुकसान होऊ शकते, अशी भीती परिसरातील वाहनचालकांनी व्यक्त केली. पलावा परिसरातून वाहन कल्याणच्या दिशेने काढताना काटई पुलाच्या चढावावर रिक्षा चुकीच्या पद्धतीने उभ्या राहतात. त्याचा त्रास वाहनचालकांना होत असतानाच आता दुभाजक ठेवल्यानेही अडथळे होत आहेत. त्या दुभाजकांना वाहन लागू नये, यासाठी काही विशिष्ट अंतरावरून वाहने नेली जात आहेत. विशेषत: रात्री पथदिवे नसल्याने वाहनांचा वेग त्या परिसरात मंदावल्याचे सांगण्यात आले.
देसाई पुलानजीक दुभाजक नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. बहुतांशी ते पूर्ण झाले आहे. नव्या दुभाजकांच्या मजबुतीसाठी काही अंतरावर जुने दुभाजक ठेवण्यात आले होते. ते लवकरच काढण्यात येतील.
- अनिरुद्ध बोर्डे, उपअभियंता, एमएसआरडीसी