नियमबाह्य होर्डिंग्जमुळे अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:15+5:302021-07-22T04:25:15+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेचे कोट्यवधी रुपये थकविणाऱ्या थकबाकीदार ठेकेदारांना पाठीशी घातले असतानाच जाहिरात फलक नियम २००३ चे उल्लंघन ...
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेचे कोट्यवधी रुपये थकविणाऱ्या थकबाकीदार ठेकेदारांना पाठीशी घातले असतानाच जाहिरात फलक नियम २००३ चे उल्लंघन करून उभारलेल्या जीवघेण्या बेकायदा होर्डिंगवर कारवाईस टाळाटाळ चालविली आहे. पालिकेसह बहुतांश नगरसेवक, राजकारणीही या गंभीर प्रकरणाकडे डोळेझाक करीत असल्याने वारा-पावसात होर्डिंग पडून अपघात होण्याची भीती वाढली आहे.
जाहिरात व फलक नियंत्रण नियमानुसार जाहिरात होर्डिंगचा आकार जास्तीत जास्त ४० फूट बाय २० फूट इतकाच बंधनकारक आहे. भोगवटा दाखला असलेल्या इमारतीच्या संरचनात्मक स्थिरतेच्या अधीन राहून इमारतीच्या गच्चीवर जास्तीत जास्त ६० फूट बाय २० फूट आकाराच्या होर्डिंग वा फलकाची परवानगी देणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मार्ग दिसण्यात अडथळा निर्माण होणे, पदपथावर तसेच रस्त्यापासून दीड मीटर अंतरापर्यंत जाहिरात फलकांना परवानगी देता येत नाही. खाडीच्या किंवा समुद्रकिनाऱ्यावरील झाडांवर तसेच भरती रेषेच्या ५०० मीटर अंतरापर्यंत परवानगी देण्यास मनाई आहे. कांदळवन क्षेत्रात परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई आहे. तरीही चेणे, वरसावे भागांत सर्रास कांदळवन व भरती रेषेच्या ५०० मीटरमध्ये मंजूर आकार, नियमांचे उल्लंघन करून जाहिरात फलकांना मंजुरी दिली आहे. एकाच जागी दोन वा चार फलक मंजूर करण्याची शक्कल लढवीत पालिकेच्या संगनमताने ठेकेदारानेही बेकायदा चार मंजूर फलकांचा केवळ एकच भला मोठा फलक उभारण्याचे प्रकार जागोजागी केले आहेत. यामुळे काजूपाडा-चेणे भागात सतत अपघात घडत आहेत. वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा पत्र देऊनही महापालिकेने कारवाईऐवजी अपघातास कारणीभूत होर्डिंगना संरक्षण दिले आहे. मुंबई-अहमदाबाद व घोडबंदर महामार्गावर तसेच काशिमीरा नाका ते भाईंदरपर्यंतच्या मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत प्रमुख ठिकाणी पदपथावर पालिकेने सर्रास होर्डिंग उभारले आहेत. तौक्ते वादळावेळी पदपथावरील होर्डिंग मोडून पडले तर काहींचे पत्रे उडाले होते.
काेट
नियमबाह्य आणि धोकादायक होर्डिंगप्रकरणी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करून दीड वर्ष उलटले तरी अजूनही कारवाई केली गेली नाही. होर्डिंग ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांनी संगनमताने लोकांच्या जिवाशी खेळ चालविला आहे. नियमबाह्य होर्डिंग तत्काळ काढून भ्रष्टाचारात सामील असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा व ठेकेदारास काळ्या यादीत टाका.
- हेतल परमार, नगरसेविका