गॅसगळतीमुळे बदलापुरात भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:28 AM2021-06-05T04:28:31+5:302021-06-05T04:28:31+5:30
बदलापूर : गुरुवारी (दि. ३) रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान बदलापुरातील शिरगाव एमआयडीसीतील नोबेल इंटरमीडिएट्स प्रा. लि. या कंपनीत गॅसगळती ...
बदलापूर : गुरुवारी (दि. ३) रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान बदलापुरातील शिरगाव एमआयडीसीतील नोबेल इंटरमीडिएट्स प्रा. लि. या कंपनीत गॅसगळती झाली होती. यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात श्वसनाचा त्रास सहन करावा लागला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या कंपनीमध्ये ओव्हरहीटमुळे सल्फ्युरिक ॲसिड व बेंझिल्स ॲसिडमध्ये केमिकल रिॲक्शन होऊन गॅसगळती झाली. त्यामुळे ३ कि.मी.च्या परिसरातील लोकांना श्वास घेण्याचा व डोळे चुरचुरण्याचा त्रास होत होता. गॅसगळतीचे प्रमाण एवढे तीव्र होते की, शिरगाव परिसरामध्ये संपूर्ण सर्वत्र धूर पसरला होता. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनादेखील वाहने दिसत नव्हती. सुदैवाने ही गॅसगळती लागलीच रोखण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. बदलापूर आणि अंबरनाथ अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, गॅसगळतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले होते; तर काही नागरिकांनी घटनास्थळापासून लांब धावण्याचा प्रयत्न केला.
---------------