कोरोनाच्या धास्तीमुळे मलेरियाचीही ‘हुडहुडी’ , रुग्ण आढळल्यास संपर्कातील व्यक्तींची रक्तचाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:49 AM2021-12-28T06:49:35+5:302021-12-28T06:50:29+5:30
Thane : महाराष्ट्र हे हिवताप रोगप्रवण असून, हा आजार जीवघेणा असल्याने त्याचा कधीही उद्रेेक होऊ शकतो, अशी आरोग्य विभागास खात्री आहे.
- नारायण जाधव
ठाणे : दुधाने तोंड भाजल्यास ताकही फुंकून पितात, असे म्हणतात. यामुळेच की काय, आता कोविड महामारीच्या संकटास तोंड देणाऱ्या महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने मलेरियासाठी नवा महाराष्ट्र साथरोग हिवताप विनियम २०२१ प्रसिद्ध केला आहे.
नव्या कायद्यानुसार मलेरिया रुग्ण आढळल्यास त्याची तत्काळ संबंधित जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेच्या आरोग्य खात्यास माहिती द्यावी, ती मिळताच संबंधित रुग्णासह त्याच्या संपर्कातील व्यक्तींची रक्तचाचणी करून तो राहतो त्या इमारतीसह ४०० मीटर परिसरात धूरफवारणी करावी, जे खासगी दवाखाने, रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक किंवा रुग्ण माहिती देण्यास टाळाटाळ करतील, त्यांच्यावर भारतीय दंडसंहिता १८६०च्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र हे हिवताप रोगप्रवण असून, हा आजार जीवघेणा असल्याने त्याचा कधीही उद्रेेक होऊ शकतो, अशी आरोग्य विभागास खात्री आहे. त्यामुळे ही संभाव्य साथ टाळण्यासाठी मलेरियाविषयीच्या आधीच्या सर्व सूचना, आदेश, अधिसूचना रद्द करून हा नवा कायदा २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केला आहे.
नव्या कायद्यानुसार मलेरियास अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिकांंचे आयुक्त यांनी तत्काळ हिवताप नियंत्रक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे. संक्रमित वसाहती, गावे यांची यादी प्रसिद्ध करून उपाययोजना करायच्या आहेत. गावे एखाद्या जिल्ह्याच्या सीमेवर असतील तर दुसऱ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ती यादी देऊन संंक्रमण राेखायचे आहे.
जिथे हिवतापाचा रुग्ण आढळेल, त्याच्या इमारतीच्या मालकाने याची माहिती आरोग्य अधिकाऱ्याला द्यायची आहे, जेणेकरून संबंधित रुग्ण व त्याच्या संपर्कातील व्यक्तींची रक्तचाचणी करून त्यांच्यावर उपचार करणे सोपे होईल. संक्रमित क्षेत्रास भेट देणाऱ्या कामगारांसह नेहमी भेट देणाऱ्यांची रक्तचाचणी करण्यात येणार आहे. शिवाय रस्ते, इमारती, शासकीय प्रकल्पांच्या बांधकाम साईटवर संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांनी योग्य काळजी घ्यायची आहे.
या व्यक्तींसह खासगी इमारतींचे मालक, भोगवटादारांनी डासांची पैदास होईल, असे पाणी जमा होणार नाही, स्वच्छता राखणे, तुटके टायर, बाटल्या, भांड्यांची विल्हेवाट लावण्यास सांगितले आहे. दरम्यान, ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. तर दुसऱ्या बाजूला मलेरियाचा फैलाव होत असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.
पाणी साचणार नाही याची खात्री करा
महापालिका, रेल्वे, दूरसंचार कंपन्या, बांधकाम ठेकेदार यांनी केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी पाणी जमा होणार नाही, याची खात्री करावी, हे खड्डे, चर याची जोडणी नैसर्गिक गटारांशी कराव्यात. जलवाहिन्यांशी त्यांचा संंपर्क येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येईल, असे बजावले आहे.
- संभाव्य साथ टाळण्यासाठी मलेरियाविषयीच्या आधीच्या सर्व सूचना, आदेश, अधिसूचना रद्द करून हा नवा कायदा २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केला आहे.