रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे रोगराईची भीती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:54 AM2020-06-06T00:54:02+5:302020-06-06T00:54:32+5:30
लॉकडाऊनमुळे ठप्प : पाणी तुंबून डोंबिवलीमध्ये साथीचे आजार बळावण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील बहुतांश ठिकाणी केडीएमसी आणि अन्य प्राधिकरणांकडून रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण, मलवाहिनी आणि अन्य सुविधा देण्यासंदर्भात खोदकामे सुरू होती. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये ही कामे ठप्प झाली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची अर्धवट स्थितीतील कामे मार्गी लावण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखवला असला, तरी काही ठिकाणची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे याठिकाणी पावसाच्या पाण्याची डबकी तयार होऊ न साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
मागील पावसाळ्यात खड्ड्यांनी वाहनचालकांचे कंबरडे मोडले. हिवाळा आणि आता उन्हाळ्यातही खोदकामांचा सिलसिला सुरूच राहिला. अनेक महिने हे रस्ते वाहतुकीपासून बंद ठेवावे लागले असून ठाकुर्लीतील ९० फूट रोडवर हे चित्र आजही कायम आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्याने कामांना विलंब लागत असल्याचे कारण दिले जात होते. आता कोरोनामुळे या कामांना पूर्णपणे खीळ बसली आहे. अर्धवट कामे झालेले काही रस्ते वाहतुकीसाठी अजूनही बंद आहेत. पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे म्हणून महापालिका आयुक्तांनी रस्त्यांवरील खड्डे डांबराच्या पॅचने भरणे आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले होते. यातील काही कामे सुरू झाली, तर काही अर्धवट स्थितीत ‘जैसे थे’च आहेत.
तात्या माने यांचे आयुक्तांना पत्र
पूर्वेकडील गोपाळनगर परिसरात रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम अर्धवट स्थितीत आहे. हे काम तातडीने सुरू करून मार्गी लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. माजी नगरसेवक तात्या माने यांनी याप्रकरणी आयुक्तांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले आहे. फेब्रुवारीपासून हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी खोदला आहे. आता रस्त्याची कामे सुरू होऊनही हे काम सुरू झालेले नाही. या अर्धवट कामांमुळे पाणी साठून अन्य साथीचे रोग पसरण्याची भीती असल्यामुळे आपण स्वत: पाहणी करावी आणि तातडीने काम पूर्ण करावे अशी मागणी माने यांनी आयुक्तांना केली आहे.