दिव्यात रोगराईची भीती; शेकडो घरांमध्ये पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:50 AM2019-08-06T00:50:38+5:302019-08-06T00:50:46+5:30
सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघड्यावर
ठाणे : सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने दिवा भागातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही या भागात अनेकांच्या घरात पाणी होते. तब्बल ७२ तासांनंतरही शेकडो घरांमध्ये पाणी असल्याने ते काढण्याची ताकदही रहिवाशांमध्ये उरली नाही. ठाणे महापालिकेने रविवारी या भागातील सुमारे ८५०० रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले. परंतु, उघड्यावर पडलेला संसार परत कोण जोडणार, असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत. पाच लाख लोकसंख्येच्या या भागात महापालिकेच्या स्थापनेपासून आरोग्य केंद्रच न उभारल्याने पुराचे पाणी ओसरले, तरी आरोग्याचा गंभीर प्रश्न या भागात निर्माण होणार आहे.
शुक्रवारी रात्रीपासून ठाण्यासह जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. याचा सर्वाधिक फटका दिवा भागाला बसला आहे. दिव्यातील अनेक भागांत शनिवारपासून पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे येथील साबेगाव, साळवीनगर, बी.आर.नगर, सिद्धिविनायकनगर, बेडेकरनगर, मुंब्रादेवी कॉलनी आदींसह इतर भागांतील शेकडो घरे पाण्याखाली गेली. रविवारी दिव्यातील अनेक घरांत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते.
सोमवारी पावसाने उसंत घेतली असली, तरी या भागात पाणीचपाणी होते. शाळकरी मुलांचे अभ्यासाचे साहित्य पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ते सुकवण्याचे प्रयत्न पाल्य आणि पालकांकडून सुरू होते. कोणी घरातील पाणी बाहेर काढत होते, तर कोणी भिजलेला संसार पाहून अश्रू ढाळत होते.
दरम्यान, निलेश पाटील यांच्यासारख्या काही स्थानिक समाजसेवकांच्या माध्यमातून या रहिवाशांना नाश्ता, जेवण आदींची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी या भागातून एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आली. मात्र, सायंकाळपासून पाणी ओसरू लागल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे या भागात मेडिकल कॅम्प घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पालिकेने दिली.
वीजही गायब : दिव्याच्या विविध भागांत ७२ तासांनंतरही पाणी ओसरले नसल्याने या भागातील अनेक रहिवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत. दुसरीकडे शनिवारपासून या भागातील वीजपुरवठाही गायब झाला आहे.