फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाचे हत्यार, तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:40 PM2017-11-08T14:40:36+5:302017-11-08T14:46:57+5:30
फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्फूर्ती ठाणो जिल्हा फेरीवाला संघटनेच्या सोमवार पासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. तिसऱ्या दिवसानंतरही त्यांच्या उपोषणाला मात्र पालिकेने दाद दिली नाही.
ठाणे - एल्फीस्टन रेल्वे पादचारी दुर्घटनेनंतर संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात, स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत. येथील फेरीवाल्यांवर कारवाई देखील सुरु झाली आहे. ठाण्यातही अशा प्रकारे फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यातही जोपर्यंत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करु नये असे आदेश असतांना देखील त्याची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप करीत स्फूर्ती ठाणे जिल्हा फेरीवाला संघटनेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. परंतु तिसऱ्या दिवशी देखील त्यांच्या उपोषणाची दखल मात्र कोणीच घेतली नाही.
मागील काही दिवसापासून स्टेशन परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात ठाणे महापालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. परंतु अद्यापही फेरीवाला धोरण राबविले का जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाला अनुसरुन महापालिका क्षेत्रात फेरीवाला समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २००९ च्या धोरणानुसार हॉकर्स झोन पूर्ण करुन फेरीवाल्यांची नोंदणी होत नाही तो पर्यंत सध्या शहरातील फेरीवाल्यांना पूर्ववत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील नियमित व्यवसाय करणारे तसेच बायोमेट्रीक सर्व्हे झालेल्या त्यांच्याकडून प्रमाणपत्र शुल्क ९०० रुपये आकारलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करुन त्यांचा माल कोणतीही पोचपावती न देता जप्त केला जात आहे. विशेष म्हणजे हा जप्त केलेला माल त्या फेरीवाल्यांना न देता परस्पर दलालांमार्फत तिराहित व्यक्तीला विकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एकूणच अशा चुकीच्या पध्दतीने पालिकेचा कारभार सुरु असल्याने या निशेध करण्यासाठी आणि फेरीवाल्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून परमार्थ निकेतन, कचराळी तलाव, महापालिका मुख्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. परंतु उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील पालिका प्रशासनाच्या वतीने त्यांना कोणत्याही अधिकाऱ्याने भेटण्यास वेळ दिली नाही. परंतु जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आमचे उपोषण सुरुच राहणार असल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले.