ठाण्यात १४ ठिकाणी दरड कोसळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:39 AM2021-05-16T04:39:04+5:302021-05-16T04:39:04+5:30
ठाणे : यंदाच्या मान्सूनच्या काळात उदभवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. ...
ठाणे : यंदाच्या मान्सूनच्या काळात उदभवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्यादृष्टीने ज्या काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याची तयारी करून दरड कोसळण्याची भीती असलेल्या नाल्याच्या बाजूला आणि डोंगराच्या जवळ असलेल्या १४ भागांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार तेथील रहिवाशांना नोटीसा बजावून घरे खाली करून इतर ठिकाणी निवाऱ्याची सोय करण्याचे सूचित केले आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात नोटीस न बजावता महापालिकेने जाहिरातींच्या माध्यमातून त्या त्या भागातील नागरिकांना त्या बजावल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी ही संख्या २६ होती ती आता १४ वर आल्याने महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना कुठेतरी यश आल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्वी आढावा बैठक घेऊन नाल्यालगत आणि डोंगरावर त्याच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्ट्यांची यादी तयार केली आहे. पावसाळा आला की दरवर्षी ती तयार केली जाते. दरवर्षी येथील रहिवाशांना नोटिसा बजावून घरे खाली करण्याचेही सांगितले जाते; परंतु पुढील कारवाई काही होताना दिसत नाही. त्यात मागील वर्षापासून कोरोनाच्या सावटाखाली ठाणेकर जगत आहेत. अशा प्रकारे नोटीस बजावण्याची कारवाई सुरू झाल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.
दरवर्षी पावसाळ्याच्या काळात अशा ठिकाणी भुस्खलन होण्याची भीती असते. मागील वर्षीदेखील अशा स्वरुपाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली घरे रिकामी करून इतर ठिकाणी वास्तव्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. परंतु, कोरोनाचे सावट असल्याने रहिवाशांनी घरे खाली करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात महापालिकेकडून कोणती भूमिका घेतली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- येथे आहे धोका
दरम्यान, मागील वर्षी अशा प्रकारची २६ ठिकाणे होती, त्यात आता घट होऊन ही संख्या १४ वर आली आहे. त्यामुळे ही समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे. या १४ ठिकाणांमध्ये मुंब्रा, लोकमान्यनगर, कळवा, माजिवडा-मानपाडा या भागांतील काही ठिकाणांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार लोकमान्यनगर भागातील गुरुदेव आश्रम जवळ, उपवन, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा यांचा समावेश आहे. कळव्यात - आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर, भास्करनगर आदींचा समावेश आहे. तसेच मुंब्य्रातील आझादनगर, गावदेवी मंदिरलगत, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगर आदी भागांचा यात समावेश आहे.