कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊनची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:48+5:302021-02-23T05:00:48+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या चार दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत पुन्हा लॉकडाऊन लागू ...
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या चार दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाईल, अशी चर्चा आहे. या भीतीपोटी नागरिकांनी खरेदीसाठी सोमवारी कल्याण पश्चिमेतील डी मार्टमध्ये एकच गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसले.
कल्याण डोंबिवलीत कोरोनारुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, गेल्या चार दिवसांत राज्यात रुग्णांची संख्या वाढत असता महापालिका हद्दीतही ती संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकेने कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील डी मार्टमध्ये ग्राहकांची गर्दी अशाचप्रकारे उसळली होती. ही माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी डी मार्टमध्ये धाव घेऊन डी मार्ट व्यवस्थापनाविरोधात कारवाई केली होती. या कारवाईस दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा सोमवारी सायंकाळी नागरिकांनी खरेदीसाठी डी मार्टमध्ये गर्दी केली. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, अशी सगळीकडे चर्चा आहे. तो लागू झाल्यावर खरेदी कुठून करणार. त्याआधीच खरेदीसाठी नागरिक रांगेत उभे आहेत. लॉकडाऊनच्या अफवेमुळे ही गर्दी दिसून येत आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षाचालकांनीही लॉकडाऊनच्या भीतीपोटीच ही गर्दी उसळली असल्याचे सांगितले.
....
डी मार्टला दहा हजारांचा दंड
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने डी मार्टविरोधात दहा हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई केली जाणार आहे. या उपरही त्यानी नियमांचे पालन केले नाही, तर ते सील करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
फोटो-कल्याण-डी मार्ट
---------------------